सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीत ८ तर परिवहन समितीच्या ६ नव्या सदस्यांची पालिका सर्वसाधारण सभेत निवड झाली. पालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर निवडले गेलेले निम्मे सदस्य जुनेच असल्याचे स्पष्ट झाले. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य पद्माकर ऊर्फ नाना काळे व भाजपचे सुरेश पाटील यांना पुनश्च संधी देण्यात आली. दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी सत्ताधारी काँग्रेसमध्ये आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू असून, यात ज्येष्ठ सदस्य सय्यद बाबा मिस्त्री यांचे नाव आघाडीवर आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी स्थायी समितीचे ८ रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात आली असता यात निवडलेले सदस्य पुढीलप्रमाणे- सय्यद बाबा मिस्त्री, मंदाकिनी तोडकरी (काँग्रेस), पद्माकर काळे व दिलीप कोल्हे (राष्ट्रवादी), सुरेश पाटील, विजया वड्डेपल्ली व महादेव पाटील (भाजप) आणि मंगल वानकर (शिवसेना). १६ सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत कायम आहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू मध्यम शहर विकास पुनरुत्थान महाअभियानांतर्गत  सोलापूरसाठी दोनशे बसेस मंजूर झाल्याच्या पाश्र्वभूमीवर परिवहन समितीतील मरगळ दूर होत आहे. त्यामुळे या परिवहन समितीवर वर्णी लागण्यासाठी सत्ताधारी व विरोधकात रस्सीखेच चालल्याचे दिसून येते. त्याचा प्रत्यय परिवहन समितीच्या नव्या ६ सदस्यांच्या निवडीच्या वेळी आला. काँग्रेसने सलीम सय्यद व राजेंद्र कलकेरी यांना संधी दिली, तर राष्ट्रवादीने आनंद मुस्तारे यांना संधी दिली आहे. भाजपकडून दीपक जाधव व आनंद धुम्मा यांची वर्णी लागली तर माकप व बसपातर्फे महिबूब हिरापुरे यांची निवड झाली आहे. परिवहन समितीच्या सभापतिपद यंदा राष्ट्रवादीकडे दिले जाणार असून त्यासाठी आनंद मुस्तारे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा