सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली बँकेच्या संचालक मंडळाची सभा पुढे ढकलण्यात येऊन ती १५ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. पदाधिकारी निवडीची सभा पुढे ढकलण्यासाठी बँकेच्या काही ज्येष्ठ संचालकांनीच आग्रह धरला होता. तथापि, पदाधिकाऱ्यांची निवड लांबली असली तरी त्यावरून जिल्हय़ातील राजकीय हालचालींना आणखी जोर चढल्याचे दिसून येते.
बँकेचे अध्यक्ष संजय शिंदे (माढा) व उपाध्यक्ष चंद्रकांत गणपतराव देशमुख (सांगोला) यांची मुदत संपल्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी ३० नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची सभा बोलावली होती. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोलापूर विभागाचे प्रांत डॉ. विजयसिंह देशमुख यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. परंतु ही सभा पुढे ढकलण्यासाठी बँकेच्या काही आमदार संचालकांनी वजन वापरून जिल्हा प्रशासनाला प्रवृत्त केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बँकेच्या अध्यक्षपदासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचे नाव अग्रभागी असल्याची चर्चा जिल्हा बँकेच्या वर्तुळात ऐकायला मिळत आहे. पाटील यांनी यापूर्वी सलग पाच वर्षे बँकेचे अध्यक्षपद सांभाळले होते. किंबहुना याच माध्यमातून त्यांचे सहकार क्षेत्रात तथा जिल्हय़ाच्या राजकारणात पदार्पण झाले होते. त्या वेळी त्यांच्याकडे फारसा अनुभव नसतानादेखील केवळ श्रेष्ठींचा पाठिंबा पाठीशी असल्याने राजन पाटील यांनी तब्बल पाच वर्षे बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा वाहण्याची संधी मिळाली होती. नंतर १९९५ ते २००९ पर्यंत त्यांनी आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदारकी कायम ठेवली होती. परंतु मागील २००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत त्यांचा मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांचा राजकीय विजनवास सुरू झाला. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचे सांगण्यात येते. आपण बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असून त्यासाठी कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, असे राजन पाटील सांगतात.
याशिवाय दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने व आमदार दीपक साळुंखे हेदेखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. आमदार दिलीप माने हे अध्यक्षपदासाठी श्रेष्ठींवर विसंबून राहिले आहेत. श्रेष्ठींचा निर्णय शिरसावंद्य मानण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तर सांगोल्याचे विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे यांनीही अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रदबदली चालविल्याचे सांगण्यात येते. सद्य:स्थितीत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत मोहिते-पाटील गटाची भूमिका सावधपणाची असली तरी शह-काटशाहच्या राजकारणात मोहिते-पाटील गट कोणती चाल खेळणार, याकडे जाणकारांचे लक्ष वेधले आहे. तर त्याचवेळी अजित पवार यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. बँकेची सूत्रे अजित पवार यांच्या माध्यमातून स्वत:कडे कायम राहण्यासाठी माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे यांचे कसोशीचे प्रयत्न चालू असल्याचे समजते. त्यामुळे शिंदे बंधूंची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदाधिकारी निवड पुढे ढकलली
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ३० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेली बँकेच्या संचालक मंडळाची सभा पुढे ढकलण्यात येऊन ती १५ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
First published on: 30-11-2012 at 09:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of office bearer for sdc bank postponed