महापालिकेत नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होऊन दोन आठवडय़ाचा कालावधी झाल्यानंतरही गटातटाच्या राजकारणामुळे महापालिकेत सत्तापक्ष नेत्याची निवड करण्यात आलेली नाही. शिवाय आचारसंहिता लागल्यामुळे आता सत्तापक्ष नेत्याची निवड लाबणीवर जाण्याची शक्यता असल्यामुळे किमान महिनाभर तरी महापौरांना दोन जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत.
प्रवीण दटके यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर सत्तापक्ष नेतेपदासाठी नगरसेवक संदीप जोशी यांच्या नावाची चर्चा असताना खामला प्रभागातील नगरसेवक गिरीश देशमुख यांचे नाव समोर आले, त्यामुळे महापालिकेत सत्तापक्ष नेत्यासाठी नवा वाद सुरू झाल्याने सत्तापक्ष नेत्याची निवड प्रक्रिया थांबविण्यात आली. सभागृहात विरोधी पक्षाचे आव्हान पेलण्यासाठी कणखर असा सत्तापक्ष नेता असला पाहिजे, अशी आजपर्यंतची महापालिकेची परंपरा आहे. त्याप्रमाणे प्रवीण दटके यांच्यानंतर संदीप जोशी यांचे नाव समोर आले होते. सत्तापक्ष नेता निवडण्याचा अधिकार हा पक्षाच्या संसदीय मंडळाला आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदीय मंडळाची गेल्या त्या काळात बैठक झाली नाही. त्यानंतर महापौर पदग्रहणाच्या दिवशी सत्तापक्ष नेता जाहीर करू, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही आठवडा उलटला तरी सत्तापक्षपद भरले गेले नाही.
महापालिकेत अजूनही सत्तापक्ष म्हणून महापौर प्रवीण दटके यांच्याकडे जबाबदारी असल्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. सत्तापक्ष म्हणून घेतले जाणारे निर्णय महापौर दटके यांना घ्यावे लागत आहेत. आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारांच्या निवड प्रक्रियेते नेते व्यस्त झाल्यामुळे सत्तापक्षाची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. एरवी सत्तापक्ष नेत्याचा निर्णय महापालिकेतील कोअर कमिटीमध्ये घेतला जात असताना यावेळी वाडा आणि बंगल्यामुळे तो होऊ शकला नाही. दोघांनी आपापल्या समर्थकांची नावे जाहीर केल्यामुळे पक्षासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
सध्या पक्षामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी सत्तापक्ष नेतेपद कोणाला देणार याबाबत पक्षामध्ये चर्चा सुरू आहे. संदीप जोशी यांनी यापूर्वी सत्तापक्ष नेतेपदाबाबत कुठलीही मागणी केली नसल्याचे पक्षाच्या नेत्यांना सांगितल्यामुळे गिरीश देशमुख यांची निवड करणे पक्षाला सहज शक्य होते. मात्र, नेमकी माशी कुठे शिंकते आहे हे कळायला आता मार्ग नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी ते शक्य होते, आता निवडणुका होईपर्यंत सत्तापक्ष नेतेपद रिक्त राहणार असून महापौरांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत.
या संदर्भात महापौर प्रवीण दटके यांना विचारणा केली असता त्यांनी सत्तापक्ष नेतेपद माझ्याकडेच असून लवकरच पक्षनेत्याची निवड केली जाईल. सध्या निवडणुकांची धामधूम असल्यामुळे सगळे नेते व्यस्त आहेत. सत्तापक्ष नेतेपदावरून कुठलाच वाद नसून योग्य वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते निवड करतील.
महापालिकेतील सत्तापक्ष नेत्याची निवड लांबणीवर पडणार
महापालिकेत नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होऊन दोन आठवडय़ाचा कालावधी झाल्यानंतरही गटातटाच्या राजकारणामुळे महापालिकेत सत्तापक्ष नेत्याची निवड करण्यात आलेली नाही.
First published on: 17-09-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection process in nashik mahanagarpalika postponed