आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:चा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वत:चा शोध घेतला, तरच तुम्ही क्रांती घडवू शकता, असे मत जलस्वराजचे उपायुक्त इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालित कृषी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते होते. कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, संचालक वसंतराव साळुंखे, अशोकराव जगताप, पोपटराव जाधव, पांडुरंग मोहिते, सर्जेराव लोकरे, पांडुरंग पाटील, उल्हास सावंत, शिवम प्रतिष्ठानचे रणजित नाईक, विश्वनाथ खोत, विद्यार्थी प्रतिनिधी सारिका वाघुले, स्वाती दौडकर, निखील गायकवाड, कारखान्याचे अधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
इंद्रजित देशमुख म्हणाले की, आजच्या समाजव्यवस्थेत भ्रष्टाचार, दारिद्रय़, निरक्षरता, लोकसंख्यावाढ, पर्यावरणाचा ऱ्हास या पाच विषारी फळांचा सामना समाजाला करावा लागत आहे. यामुळे सामान्य माणसाला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. आपण बी. एस्सी. अ‍ॅग्रीची पदवी घेतल्यानंतर अधिकारी म्हणून काम करताना या पाच विषारी फळांचा नाश करणे, यात सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम करावे. मीही याच क्षेत्रातील विद्यार्थी असल्याने वडिलबंधूच्या नात्याने ही अपेक्षा व्यक्त करतो.
अविनाश मोहिते म्हणाले की, इंद्रजित देशमुख यांनी आज विद्यार्थाना जे मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे या महाविद्यालयाचा विद्यार्थी भावी आयुष्यात निश्चित आदर्श असे काम करेल अशी आम्हाला खात्री आहे. यावेळी विद्यापीठ व देशपातळीवर सहभागी झालेले खेळाडू, पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रारंभी कै. आबासाहेब मोहिते व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हिम्मत पाटील यांनी केले. कैलास नाळे व निलिमा जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष नारायण किल्लेदार यांनी आभार मानले.

Story img Loader