बदलापूरमधील यशोधन महिला बचत गटाची कामगिरी
गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला लागवडीसारख्या छोटय़ा व्यवसायांच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाचे मोठे काम करणाऱ्या महिला बचत गटांनी आता औद्योगिक विभागातील तांत्रिक कामे करण्यातही पुढाकार घेतला आहे. बदलापूर येथील यशोधन महिला गट गेले वर्षभर अंबरनाथ येथील एका उद्वाहननिर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी सुटय़ा भागांची जुळणी करण्याचे काम यशस्वीपणे करीत आहे. या बचत गटात एकूण १४ महिला असून त्यातील पाचजणी सध्या पूर्णवेळ हे काम करतात.
बदलापूर येथील मानव पार्क, हेंद्रेपाडा, रमेशवाडी भागांत चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यशोधन महिला बचत गटाने सुरुवातीला घाऊक दराने गहू आणून परिसरात विकण्याचा व्यवसाय केला. मात्र त्यातून फारसा नफा मिळत नसल्याने पुढे त्यांनी दुसऱ्या व्यवसायाचा शोध सुरू केला. त्याच वेळी अंबरनाथ येथील ओंकार इलेक्टॉनिक्स ही उद्वाहननिर्मिती करणारी कंपनी आऊटसोर्सिग स्वरूपात काम देण्याच्या पर्यायाचा विचार करीत होती. बदलापूरमधील नगरसेवक राजन घोरपडे यांनी या महिलांना त्याविषयी सुचविले. कंपनीने बचत गटातील चार जणींना दोन महिने रीतसर या कामाचे तांत्रिक प्रशिक्षण दिले. त्यानंतर बदलापूरमध्ये या बचत गटाने उद्वाहन यंत्राच्या सुट्टय़ा भागांच्या जुळणीचे काम सुरू केले. प्रशिक्षण घेतलेल्या आम्हा चौघींनी इतर सहा जणींनाही हे काम शिकविले, अशी माहिती बचत गटाच्या अध्यक्षा संध्या पाटील यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.
संध्या पाटील यांच्यासह वैशाली तुपे, राजश्री उतळे, मार्गारेट अँथोनी आणि चेतना पांचाळ या बचत गटातील पाचजणी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत गेले वर्षभर हे काम करीत आहेत. कंपनी त्यांना त्यांच्या कामाच्या जागी उद्वाहन यंत्राचे सुटे भाग आणून देते आणि जुळणी केल्यानंतर घेऊन जाते. जागेचे भाडे, इतर देखभाल खर्च वजा जाऊन सध्या प्रत्येकीला महिन्याकाठी साडेचार हजार रुपये उत्पन्न मिळते. या बचत गटातील आणखी एक सदस्या राजश्री उतळे ब्लँकेट, चादरी विक्रीचा व्यवसाय करतात.
लिफ्टची जुळणी समाधानकारक
कंपनीमध्ये प्रशिक्षित इलेक्ट्रिशियन सुट्टय़ा भागांच्या जुळणीचे काम करतात. मात्र यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही स्वरूपाचे तांत्रिक काम न केलेल्या यशोधन महिला बचत गटाच्या महिलांनी अवघ्या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणातून हे काम चांगल्या प्रकारे आत्मसात केले असून त्यांचे काम समाधानकारक असल्याची माहिती ओंकार इलेक्टॉनिक्सच्या गौरी अरुणाचल यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा