मंगला लोंढे यांच्या उद्योग करण्याच्या इच्छेला प्रशिक्षणाची साथ मिळाल्याने त्यांनी अगरबत्ती बनवण्याचा उद्योग सुरू केला. आता घरच्यांबरोबरच शेजारच्या महिलांना उत्पन्नाचा नवा स्रोत त्यांनी खुला केला आहे. मुंब्रा येथील सफुरा वसगरे या तरुणीची आई चायनीज रोल करून विकायची. सफुराने अन्नप्रक्रियाविषयक प्रशिक्षण घेऊन आईच्या व्यवसायाला मदत करून छोटय़ा कामाचे उद्योगात रूपांतर केले. सतेज पाटील आणि भरत गावकर या दोन तरुणांनी फोटोग्राफीची कला आत्मसात करत स्वत:चा फोटो स्टुडिओ सुरू केला, तर साहेबराव गावडे आणि सुधीर चौधरी या तरुणांनी मोबाइल रिचार्ज विकण्याबरोबरच मोबाइल रिपेअरिंगच्या प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. ठाण्यातील महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २६८ जणांनी प्रशिक्षण घेतले असून छोटय़ा-छोटय़ा उद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचा ‘महा’मार्ग ही मंडळी अवलंबत आहेत.
कर्नाटकमधील रुरसेट या गावातील वीरेंद्र हेगडे या तरुणाने स्वयंरोजगाराचा एक उपक्रम सुरू केला होता.
अत्यंत यशस्वी ठरलेल्या या उपक्रमाचे केंद्र सरकारकडून कौतुक करण्यात आले आणि स्वयंरोजगाराचे हे मॉडेल देशभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत सरकारचे ग्रामीण विकास मंत्रालय, राज्य शासनाचे ग्रामविकास विभाग आणि राज्यातील अग्रगण्य बँकेच्या मदतीने देशभर हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. ठाण्यामध्ये २०११ मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला असला तरी खऱ्या अर्थाने एप्रिल २०१३ रोजी या उपक्रमाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात जिल्हा परिषद कार्यालय परिसरामध्ये झाली. बँक ऑफ महाराष्ट्राने ठाणे जिल्ह्य़ातील या उपक्रमात सहभाग नोंदवल्यामुळे या केंद्राचे ‘महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील अल्प-उत्पन्न गटातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती आणि महिलांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराची संधी, मोफत प्रशिक्षण आणि बँक कर्जाची उपलब्धता देण्यासाठी मार्गदर्शन या उपक्रमातून सुरू झाले. नामांकित प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती यांच्या जोरावर या उपक्रमातून छोटे उद्योजक निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
मंगला लोंढे या एका पतसंस्थेमध्ये दैनिक बचतीचे पैसे गोळा करण्याचे काम करायच्या. त्यातून त्यांना मासिक चार हजारांचे उत्पन्न मिळत होते. पतीची २००७ मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर सहा जणांच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाले. मात्र डिसेंबर २०१३ मध्ये त्यांनी अगरबत्ती प्रशिक्षण घेतले आणि या उद्योगास सुरुवात केली. सध्या त्यांचे महिन्याचे निव्वळ उत्पन्न सुमारे १९ हजारांपर्यंत पोहोचले आहे. आजूबाजूच्या पुरुष उद्योजकोंच्या तुलनेत आपणसुद्धा चांगला उद्योग करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याचे त्या सांगतात.
कल्याणातील गोवेलीमध्ये नवे निवासी केंद्र
ठाणे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये गेल्या एक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रशिक्षण केंद्राची जागा अत्यंत मर्यादित असल्याने लवकरच हे केंद्र कल्याणमधील गोवेली गावात हलवण्यात येणार आहे. शासनाच्या एका इमारतीमध्ये हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी मुलांना राहण्यासाठी जागा, प्रशिक्षणासाठी खोली, मार्गदर्शक आणि संचालकांसाठी निवासाची व्यवस्था अशा सोयी असलेले नवे केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाने उपलब्ध केलेल्या या जागेच्या दुरुस्तीच्या कामांच्या पूर्ततेनंतर ठाण्यातील हे केंद्र गोवेलीमध्ये स्थलांतरित होणार आहे, अशी माहिती महाबँकचे संचालक उल्हास परब यांनी दिली.
स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत दिले जाणारे प्रशिक्षण
मेणबत्ती बनविणे, मोबाइल रिपेअरिंग, बीपीओ आणि कॉलसेंटर, वर्क प्लेस हाऊसकीपिंग, टेलरिंग व ड्रेस डिझायनिंग, ब्युटी पार्लर, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, अन्नप्रक्रिया, सॉफ्ट टॉइज खेळणी, कागदाच्या पिशव्या, बॅग फाइल, ब्युटी पार्लर, उद्योजकता विकास प्रशिक्षण, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन, कुक्कुट पालन, सेंद्रिय शेती, रोपवाटिका, दुचाकी सव्र्हिसिंग, अगरबत्ती बनविणे आणि जेम्स आणि आर्टिफिशल ज्वेलरी बनविणे अशा स्वरूपाचे प्रशिक्षण पुढील वर्षी संस्थेतून दिले जाणार आहे.