* क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी बाल चित्रकार चित्रे रेखाटणार
* गुरुकुल स्कूल ऑफ आर्टचा आगळा उपक्रम
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे क्रांतिकारकांचे भव्य संग्रहालय तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात ज्या सेल्युलर कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ते कारागृह आणि तेथील कोलूची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या भव्य प्रकल्पाच्या निधी संकलनासाठी लालबाग येथील गुरुकूल स्कूल ऑफ आर्टने शुक्रवार, १९ एप्रिल रोजी एक आगळा उपक्रम राबवायचे ठरविले आहे. संस्थेचे सुमारे २०० विद्यार्थी शुक्रवारी लालबाग येथे पदपथावर बसून चित्रे रेखाटणार असून यातून जमा झालेल्या निधीत आपल्या खाऊच्या पैशांची भर टाकून सर्व रक्कम स्मारकाला देणगी म्हणून देणार आहेत.
नुकत्याच ग्रीस येथे झालेल्या जागतिक चित्रकला स्पर्धेत गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या काही विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले होते. या विद्यार्थ्यांसह संस्थेत चित्रकला शिकायला येणारे विद्यार्थी या आगळ्या उपक्रमात सहभागी होणार असून सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत ही मुले चित्रे काढणार आहेत. वीर महाल, गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग (भारतमाता चित्रपटगहासमोर) येथे ही मुले शुक्रवारी दिवसभर चित्रे काढायला बसणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक पृथ्वीराज कांबळी यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. २
प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी काही दिवसांपूर्वी स्मारकाच्या या प्रकल्पासाठी सावरकर स्मारक येथे प्रकल्पाला देणगी देणाऱ्या व्यक्तिंची अर्कचित्रे काढून देण्याचा उपक्रम राबवला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगून कांबळी म्हणाले की, पदपथावर बसून हे विद्यार्थी तीथे येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांची चित्रे काढून देतील. त्यातून या मुलांना जी काही आर्थिक मदत मिळेल त्यात आपल्या स्वत:जवळील खाऊच्या पैशांची भर घालून ही सर्व रक्कम सावरकर स्मारकाच्या उपरोक्त प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांना याविषयी कल्पना दिली असून त्यांनीही परवानगी दिली आहे. या उपक्रमाबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग आणि घटना चित्रित केलेले एक छोटे चित्रप्रदर्शनही ‘गुरुकुल’ मध्ये भरविण्यात येणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनासही भेट द्यावी आणि बालचित्रकारांकडून चित्रे काढून घेऊन या उपक्रमास हातभार लावावा. तसेच कार्यक्रमस्थळी जास्तीत जास्त जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही कांबळी यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self willed artist