कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी, कॉलेजमध्ये जुळलेले नंतर अपयशी ठरलेले प्रेम, कॉलेजच्या आठवणी, मित्रांची भंकस या सगळ्या आठवणी प्रत्येकाने मनात जपलेल्या असतात. कॉलेज कट्टय़ावर केलेला टाइमपास, मारामाऱ्या, फालतूची खुन्नस, ठसन, मैत्रिणी, मित्रांची दिलदारी याचा अनुभव ‘दुनियादारी’ हा चित्रपट देतो. सुहास शिरवळकर यांची गाजलेली कादंबरी ‘रेट्रो लूक’मध्ये देखण्या रूपात दिग्दर्शकाने चित्रपटात मांडली आहे. आजच्या तरुणाईबरोबरच सर्वच प्रेक्षकांना कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देणारा हा देखणा चित्रपट मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करतो. मध्यांतरानंतर काहीसा संथपणे सरकणारा हा चित्रपट आयुष्याचे अनेक रंग दाखवत छान मनोरंजन करतो.
श्रेयस तळवलकर (स्वप्निल जोशी) पुण्याच्या एस. पी. कॉलेजमध्ये शिकायला येतो आणि दिगंबर शंकर पाटील ऊर्फ डीएसपीच्या (अंकुश चौधरी) टोळक्यात सामील होतो. आई-वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या श्रेयसला दिलदार घट्ट मैत्रीचा अनुभव मिळतो. कट्टा गँगमध्ये मग श्रेयसला साईनाथ (जितेंद्र जोशी), सुरेखा भाटे (रिचा परियाली), अशोक सकपाळ ऊर्फ अश्क्या (अजिंक्य जोशी), नितीन पगारे (राजेश भोसले), सुनील भोसले ऊर्फ सॉरी (प्रणव रावराणे), श्रीकांत शिरसाट (योगेश शिरसाट), उमेश राजहंस (अमित बेंद्रे) भेटतात आणि त्यांची घट्ट मैत्री होते. नंतर शिरीन घाटगे (सई ताम्हणकर), मीनाक्षी इनामदार ऊर्फ मीनू (उर्मिला कानेटकर) आणि प्रीतम घाटगे (सुशांत शेलार) हेही या कट्टा गँगमध्ये सामील होतात आणि शिरीन-श्रेयस तसेच मीनू-श्रेयस यांच्यातील प्रेमाची गोष्ट आणि समांतरपणे मित्रांची गोष्ट, डीएसपी-सुरेखा यांचे प्रेम, कट्टा गँगची साई देडगावकरसोबत असलेली दुश्मनी, प्रत्येक वेळी साईच्या राडय़ामुळे निर्माण होणारा पेच आणि तो सोडविण्यासाठी डीएसपी-श्रेयस यांच्या दिलदार यारीचा प्रयत्न याभोवती चित्रपट घडतो.
हा चित्रपट दिग्दर्शकाच्या मनात खूप काळापासून घर करून राहिलेला चित्रपट असल्याचे त्याने जाहीर केल्यानंतर अतिशय गाजलेल्या अशा कादंबरीवरील या चित्रपटाबाबत निर्माण झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. प्रेक्षकांनी अगोदरच वाचलेल्या गोष्टीतील परिचित व्यक्तिरेखा पडद्यावर मांडण्याचे आव्हान दिग्दर्शकाने पेलले आहे. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात अमिताभचा करिष्मा अनुभवणाऱ्या प्रेक्षकाला त्या काळातील कॉलेज युवकांचे कपडे, बेलबॉटम फॅशन कशी होती याची मस्त झलक चित्रपटात झकास दाखवली आहे.
डीएसपी असो की सॉरी, शिरीन असो की मीनाक्षी सगळ्याच व्यक्तिरेखांची ओळख प्रेक्षकाला करून देण्याची दिग्दर्शकाची पद्धत प्रेक्षकाची दाद मिळवणारी आहे. मध्यांतरापर्यंत सर्व प्रमुख व्यक्तिरेखांची ओळख, कट्टा गँगची धमाल, मीनूला पटविण्यासाठी लढविलेली शक्कल, व्यक्तिरेखांचे स्वभाव यामुळे धमाल येते. मध्यांतरानंतर चित्रपट भावभावनांचे गहिरे रंग दाखविण्याकडे वळतो. चित्रपटाचे असे दोन भाग पडतात. तरीही डीएसपी-सुरेखा यांचे लग्न होणार की नाही, मवाली डीएसपी चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करणार की नाही. श्रेयसच्या प्रेमात पडलेली मीनू आणि शिरीनच्या प्रेमात पडलेला श्रेयस यांच्यापैकी श्रेयस कुणाशी लग्न करणार अशी सगळ्या कोडय़ांची उकल दिग्दर्शकाने परिणामकारकरीत्या दाखवली आहे.
आजच्या तरुणाईबरोबरच सर्वच प्रेक्षकांचे नवरसपूर्ण मनोरंजन करणारा असा हा चित्रपट आहे. डीएसपीची ‘तेरी मेरी यारी..’ असो की नेहमी चुकीची माहिती देणारा ‘सॉरी’ असो, मेव्हणे-मेव्हणे मेव्हण्यांचे पाव्हणे म्हणणारा साई असो, गद्दारी करणारा अश्क्या असो सर्वच व्यक्तिरेखांच्या वैशिष्टय़पूर्ण शैली, लकबी आणि सर्वच कलावंतांचा अभिनय यामुळे चित्रपट खुलतो, प्रेक्षकाला भावतो.
अमिताभच्या स्टाईलचा आपल्या व्यक्तिरेखेसाठी अंकुश चौधरीने केलेला योग्य वापर, ‘बच्चू’ ही प्रतिमा ठसवणारा भोळाभाबडा स्वप्निल जोशीचा अभिनय, शिरीनच्या व्यक्तिरेखेला असलेल्या छटा अभिनयातून नीटपणे दाखवण्याचा सई ताम्हणकरने केलेला प्रयत्न याला दाद द्यायला हवी.
व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत
दुनियादारी
निर्माता – ड्रीमिंग ट्वेन्टी फोर सेव्हन
दिग्दर्शक – संजय जाधव
मूळ कादंबरी- सुहास शिरवळकर
पटकथा व संवाद – चिन्मय मांडलेकर
छायालेखक – प्रसाद भेंडे
संगीत – समीर साप्तीसकर, पंकज, अमितराज
गीते – मंदार चोळकर, सचिन पाठक
संकलन – आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले
कला दिग्दर्शन – महेश साळगावकर
कलावंत – स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, जीतेंद्र जोशी, रिचा परियाली, सुशांत शेलार, अजिंक्य जोशी, राजेश भोसले, प्रणव रावराणे, योगेश शिरसाट, अमित बेंद्रे, वर्षां उसगावकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी, उदय सबनीस, नागेश भोसले.
दिलदारी ‘तेरी मेरी यारी..’
कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी, कॉलेजमध्ये जुळलेले नंतर अपयशी ठरलेले प्रेम, कॉलेजच्या आठवणी, मित्रांची भंकस या सगळ्या आठवणी प्रत्येकाने मनात जपलेल्या असतात.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 21-07-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selfless friendship in duniyadari