१७४ कुटुंबांना दिवाळीत लॉटरी
नेरुळ येथील अनिवासी भारतीय संकुलात गेले अनेक दिवस पडून असलेल्या घरांची विक्री केल्यानंतर सिडकोने आता खारघर सेक्टर येथील सेलिब्रेशन गृहसंकुलातील १७४ घरांची विक्री दिवाळीच्या सुमारास करणार आहे. शासकीय कर्मचारी, अनुसूचित जाती, जमातींसाठी या घरातील काही घरे आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत. गेल्या काही वर्षांत घरांच्या किमती भरमसाठ वाढल्याने या घरांचा दरही सर्वसाधारणपणे पाच हजार रुपये प्रति चौरस फुट असण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर या घरांची सोडत निघणार असल्याने १७४ घरांमध्ये यावर्षीची दिवाळी मोठय़ा धूमधडाक्यात साजरी होणार आहे.खारघर सेक्टर १६ व १७ मध्ये सिडकोने चार वर्षांपूर्वी सेलिब्रेशन नावाची वसाहत निर्माण केली आहे. एक हजार २२४ घरांच्या या संकुलात आता १७४ घरे शिल्लक आहेत. सेलिब्रेशनमधील घरांसाठी ग्राहकांच्या चांगल्याच उडय़ा पडल्या होत्या. एक हजार घरांसाठी लाखभर अर्ज आले होते, पण तो काळ आर्थिक तेजीचा होता. आयटी क्षेत्रात असणाऱ्या बूममुळे अनेक तरुणांनी आपल्या घरांचे स्पप्न साकार केले होते. मात्र सध्याचा काळ हा जागतिक आर्थिक मंदीचा असल्याने या महिन्यात निघणाऱ्या या घरांच्या जाहिरातींसाठी किती अर्ज येतील याचा अंदाज मांडणे सिडको अधिकाऱ्यांनाही कठीण आहे. या १७४ घरांपैकी ६० ते ७० घरे ही शासकीय कर्मचारी व अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. चार वर्षांपूर्वीच्या सोडतीत ही घरे या संवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली होती, पण त्यासाठी आलेले अर्ज नंतर झालेल्या छाननीमध्ये बाद करण्यात आले होते. त्यामुळे ज्या वर्गासाठी ही घरे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. त्यांनाच ही घरे विकण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. शिल्लक इतर घरे ही खुल्या वर्गासाठी आहेत. ४६५ आणि ८५० चौरस फुटांची ही घरे इतर खासगी बिल्डरांच्या घरापेक्षा मोठी आहेत. सिडको घरे बांधताना घरावरील अतिरिक्त भार (लोिडग) कमी ठेवत असल्याने ही घरे मोठी असल्याची दिसून येतात. चार वर्षांपूर्वी सिडकोने सेलिब्रेशनमधील घरांची विक्री तीन हजार २०० रुपये प्रति चौरस फुट मध्ये केली होती, पण वाढत्या महागाईमुळे विक्री करण्यात येणाऱ्या घरांची आजची किंमत पाच हजार रुपये प्रति चौरस फुट आहे. ४६५ चौरस फुटांचे घर तीस लाखांपर्यंत मिळणार आहे तर ८५० चौरस फुट घरांची किंमत ५५ ते ६० लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सिडकोने वसविलेले खारघर हे उपनगर इतर सर्व उपनगरांपेक्षा वेगळे असून या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प रुजू झालेले आहेत. यात पावसाळ्यात तरुणाईला आकर्षित करणारा पांडवकडा, सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स यांसारखे प्रकल्प मनाला भुरळ घालणारे असल्याने आर्थिक मंदीच्या काळातही सिडकोने येथील घरे विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको कामगार संघटनेने या घरांची मागणी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केली होती, पण प्रशासनाने ती मागणी फेटाळून लावली. या महिन्यात या घरांसाठी अर्ज मागविण्यात येणार असून पुढील महिन्यात या अर्जाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे काही कुटुंबियांच्या घरांतील दिवाळी आनंदमय होणार आहे. सिडकोचे पणन व्यवस्थापक विवेक मराठे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

Story img Loader