राज्यात गुटखा बंदी लागू झाल्यानंतर जुलै ते ऑक्टोबर २०१२ या चार महिन्यात ७७४ संस्थांमधून १० कोटी, १६ लाख, ८५ हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्याचे अन्न व औषधी द्रवे प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
राज्यात गुटखा बंदी लागू केल्यानंतरही विक्री सुरू असल्याबाबत विरोदी पक्षनेते एकनाथ खडसे,  योगेश सागर, संजय जाधव, विजयराज शिंदे, जयकुमार रावल, गणवत गायकवाड, महादेव बाबर, गोवर्धन शर्मा, एकनाथ शिंदे, रूपेश शर्मा, एकनाथ शिंदे, सूर्यकांत दळवी, खुशाल बोपचे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यात १९ जुलै २०१२ पासून गुटखा बंदी लागू झाल्यानंतर परभणी, बुलढाणा, नांदेड, पुणे आणि मुंबईच्या काही भागात पाचपट दराने गुटख्याची वक्री सुरू असल्याचे आढळले नाही. तथापि, जुलै ते ऑक्टोबर २०१२ दरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून  गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. ७७४ संस्थांमधून दहा कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत ३७ प्रकरणांमध्ये ४१ लाखांचा गुटखा, पानमसाला नष्ट करण्यात आला असून आरोपींकडून दोन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे, असे मनोहर नाईक यांनी सांगितले.

Story img Loader