महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागृती व्हावी, या हेतूने ‘कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन’ आणि दिलासा (टिळक मंदिर) या संस्थांतर्फे ‘जागतिक कर्करोग दिना’निमित्त एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विलेपार्ले पूर्व येथील गोखले सभागृहामध्ये (टिळक मंदिर, राममंदिर मार्ग) रविवार, ३ फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी पाच ते आठ या कालावधीत हा परिसंवाद होणार आहे. ‘लोकसत्ता’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.
डॉक्टर आणि जिज्ञासू नागरिक यांच्यात थेट संवाद व्हावा, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या परिसंवादात नीता गोरे, संचालिका- कॅन्सर पेशंट्स अँड असोसिएशन, डॉ. रश्मी फडणवीस- स्त्रीरोगतज्ज्ञ (दिलासा), शमा देवरे, डॉ. हिरेन देसाई, डॉ. ॠचा कौशिक, डॉ. वृंदा करंजगावकर, डॉ. मंदा पुरंदरे आदी प्रथितयश तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.  लोकमान्य सेवा संघातर्फे हा परिसंवाद होणार असून न्यू इंडिया अ‍ॅश्यूरन्स कं. आणि भारतीय जीवन विमा त्याचे प्रायोजक आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने या प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. सुमन नाईक व नीता मोने या कर्करोगावर मात करणाऱ्या महिला या वेळी अनुभवकथन करणार आहेत.