बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व शारीरिक असुरक्षितता, एकटेपणा, अपंगत्व या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखी आणि समाधानाने जावे, यासाठी शासनातर्फे विविध योजना राबवण्यात येत असल्या तरी त्यांना मानसिक आधाराची खरी गरज असल्याचे मत ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. वैद्यकीय सोयी, सकस आहार यामुळे भारतातील नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढत आहेत. असे असले तरी वयाच्या साठीनंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत ज्येष्ठांना गुडघेदुखी, स्मृतीभ्रंश, मधुमेह हे आजार प्रामुख्याने होतात. वारंवार पडण्यामुळे फ्रॅक्चरसारख्या समस्याही निर्माण होतात. तेव्हा वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला जेरियाट्रिक सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर शाखेचे सचिव डॉ. संजय बजाज यांनी दिला आहे.
वयाची साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वृद्धाश्रमाकडे जाण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याचे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने केलेल्या एका पाहणीत आढळून आले असून त्यापैकी ४० टक्के लोकांची मुले विदेशात राहत असल्याने त्यांच्याजवळ वृद्धाश्रमात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचेही लक्षात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढी झपाटय़ाने समोर जात असताना विभक्त कुटुंब व्यवस्थाही बोकाळू लागली असून घरातील वडिलधारी मंडळीकडे लक्ष देण्यासाठी मुलांना वेळ नागी. परिणामी ज्येष्ठांच्या समस्या वाढत चालल्या असून परिणामी अनेक ज्येष्ठ नागरिक मोठय़ा प्रमाणात वृद्धाश्रमाकडे वळू लागले आहेत.
सर्वसाधारणपणे बरेच ज्येष्ठ नागरिक आपला भूतकाळ विसरू शकत नाहीत व त्यातील आठवणी काढून दु:ख करीत बसतात. कोणाला आपल्या कुटुंबात आपण कसे कंेद्रस्थानी होतो आणि आपल्या कुटुंबातील इतर माणसे कशी वागत होती याची सतत आठवण येत राहते. आपण ज्या काळात वावरलो तो काळ अतिशय चांगला होता व आताचा काळ वाईट आहे या समजुतीत अनेक ज्येष्ठ नागरिक जगत असतात. इतकचे नव्हे तर आमची पिढी फार चांगली होती आणि नवीन पिढी तशी नाही अशी समजूत करून घेऊन अनेक जण दु:ख करताना आढळतात. चिकित्सक नजरेने पाहिले तर भूतकाळात सर्वच चांगले होते असे म्हणता येणार नाही. अनेकांना हे निश्चित आठवत असेल की आता सहज उपलब्ध असलेल्या किती तरी सोयी पूर्वी मिळत नव्हत्या.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांविषशयी बोलताना ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष वि.भ. करगुटकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत विदेशात जाऊन शिक्षण घेणे किंवा मुलगा आणि सून विदेशात जाऊन स्थायिक होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यातूनच अनेक ज्येष्ठ नागरिक आज समाजात एकाकी जीवन जगत आहे. अशा एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांची संख्या गेल्या दोन वर्षांत दुपटीने वाढली आहे. त्यामुळे एकाकी जीवन जगण्यापेक्षा वृद्धाश्रमाकडे जाणे बरेच या मानसिकेतेमधून वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली आहे. विदर्भामध्ये ६० ते ७० वृद्धाश्रम असून त्यात वयाची सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० ते १५ हजारच्या घरात आहे. त्यापैकी ४० टक्के ज्येष्ठ नागरिकांची मुले ही विदेशात असल्याची माहिती मिळाली.
अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्वीच्या आणि आताच्या काळाबाबत बोलत असतात मात्र पूर्वीचा काळ चांगला होता का आताचा काळ चांगला आहे हा विषय विवाद्य आहे असे गृहीत धरले, तरी हे निश्चित की त्यामुळे वर्तमानकाळात दुख करीत बसणे हे अत्यंत चुकीचे आहे. आपण कोण होतो, आपला काळ कसा होता वगैरेच्या आठवणी जागत्या ठेऊन निराश होण्याचे काहीच कारण नाही. सध्याचे जीवन सुखी करायचे असेल तर भूतकाळ जितका लवकर विसरता येईल व जितका जास्त विसरता येईल तितके चांगले हे ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. भविष्यकाळात काय घडेल हे तर कोणालाच सांगता येत नाही, असे असताना त्याची चिंता करत सध्याचा काळ दुखात घालवणे हे केव्हाही अयोग्यच ठरेल. ज्याच्यावर आपले नियंत्रण नाही त्याबाबत चर्चा करणे किंवा मनात विचार करणे हेच मुळात चुकीचे आहे. असा भूतकाळ आपण आता बदलू शकत नाही तसा भविष्यकाळही आपल्याला बदलता येणार नाही. भविष्यकाळात वाईटच घडेल असे आपण कशाकरता गृहीत धरावयाचे. उलट चांगले घडेल असेच समजून वर्तमानकाळ सुखात घालवणे हेच शहाणपणाचे आहे असेही करगुटकर म्हणाले.

Story img Loader