राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार नवीन गृहनिर्माण संस्थांमध्ये ज्येष्ठांसाठी सदनिका राखीव ठेवल्या जाणार असून ज्येष्ठांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक प्रश्न सोडवण्यासाठीच सरकारने हे धोरण आणले आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शनिवारी रात्री येथे केले.
येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात शोध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डी.आर.बन्सोड, पोलीस आयुक्त अजित पाटील, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, शोध प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व माजी आमदार सुलभा खोडके, ऑल इंडिया सिनिअर सिटिझन्स कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष डी.एम. चापके, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाडे आदी उपस्थित होते.
मंगळावर उपग्रह पाठवण्यापर्यंतची मजल आजच्या आणि कालच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पिढीच्या कर्तृत्वावरच आपण गाठली आहे. त्यामुळे ज्येष्ठांविषयी कृतज्ञतेची भावना आपण ठेवली पाहिजे. राज्यात ज्येष्ठ नागरिकांना सवलती मिळवण्यासाठीची ६५ वर्षांची वयोमर्यादा ६० वर्षांवर खाली आणण्यासाठी सरकार निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न केवळ आर्थिक स्वरूपाचे नाहीत, तर सामाजिक आणि मानसिक स्वरूपाचेही आहेत. त्यांना सर्वत्र प्राधान्य मिळाले पाहिजे.
चांगली परिस्थिती असतानाही आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे. सोबतच ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे वृद्धांना सवलती देण्याचा विचार खाजगी क्षेत्रानेही केला पाहिजे, असे आर.आर. पाटील म्हणाले.
घरात ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणारे कुणीही नसेल, त्या ठिकाणी पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी प्रत्येक महिन्यात एकदा जाऊन त्यांची विचारपूस करेल. ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्याचे आयोजन करणारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस संजय खोडके यांचा उल्लेख आर.आर.पाटील यांनी ‘विदर्भाचा श्रावणबाळ’ असा केला. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. अशा सामाजिक आयोजनाबद्दल त्यांनी सुलभा खोडके यांचे अभिनंदन केले.
यावेळी आर.आर.पाटील यांच्या हस्ते शोध प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘हेल्पलाईन’चे उद्घाटनही करण्यात आले. प्रास्ताविक सुलभा खोडके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरज हेरे, तर प्रा. संजय आसोले यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा