‘पूर्वीपेक्षा आता मराठी चित्रपटसृष्टी अधिक प्रगल्भ झाली आहे. पण, तंत्रज्ञानामुळे समाजात माणसामाणसांतली दरी वाढताना दिसते आहे. माणसाच्या मेंदूला गंज चढला आहे की काय असे वाटते आहे. एकुणातच माणूसकी हरवत चालली आहे आणि ते तीव्रतेने जाणवते आहे’, ही खंत आहे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची.
पुढचे पाऊल, सर्जा, माझे घर माझा संसार असे विविध आशयांवरचे दर्जेदार चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणाऱ्या राजदत्त यांचा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राजदत्त यांनी उपरोक्त शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
मराठी चित्रपटसृष्टीत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये संस्कृती कलादर्पणने आपली ओळख निर्माण केली आहे. यावर्षी संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार शिवाजी लोटन पाटील यांना ‘धग’ चित्रपटासाठी देण्यात आला. तर सवरेत्कृष्ट कथेसाठीही शिवाजी लोटन पाटील व नितीन दीक्षित यांना पुरस्कार मिळाला. सवरेत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार ज्येष्ठ लेखक-नाटककार रत्नाकर मतकरी यांनी ‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटासाठी मिळविला तर यावर्षी सुपरहिट झालेल्या बी. पी. या चित्रपटाच्या संवादांसाठी अंबर हडप, रवी जाधव, गणेश पंडित यांनी पुरस्कार पटकाविला. सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘तुकाराम’मधील प्रमुख भूमिकेसाठी जीतेंद्र जोशी याने तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेती उषा जाधव हिने ‘धग’ चित्रपटासाठी पटकाविला. सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेता पुरस्कार उपेंद्र लिमये (धग), किशोर कदम (टुरिंग टॉकीज) यांना विभागून देण्यात आला. तर सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री पुरस्कारावर पिपाणी चित्रपटातील भूमिकेसाठी हेमांगी कवी हिने मोहोर उमटवली. कला दिग्दर्शनाचा पुरस्कारही बी. पी. चित्रपटासाठी दिलीप मोरे व संतोष फुटाणे यांनी पटकाविला तर सवरेत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार संजय जाधव (आयना का बायना), अनिकेत के (ऐक) यांना विभागून देण्यात आला. चिनार-महेश या संगीतकारांनी बी. पी. चित्रपटासाठी संगीताचा पुरस्कार स्वीकरला. यंदा बालकलाकार पुरस्कारासाठी चिंटू, धग, तुकाराम, टुरिंग टॉकीज, इन्व्हेस्टमेंट या चित्रपटांमध्ये चुरस होती. हंसराज जगतापने धग चित्रपटातील भूमिकेसाठी बालकलाकार पुरस्कार मिळविला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा