या जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाविषयी प्रशासनाने तयार केलेला अहवाल अंतिम नाही. प्रशासनाने घाईगडबडीत नुकसानीचा अहवाल तयार केल्याने आपण चिंताग्रस्त आहोत. गावातील सरपंचासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत या नुकसानीचे सर्वेक्षण करा आणि वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश आपण दिले आहेत. प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदत मिळवून देण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर संघर्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, अशा शब्दात केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
सोमवारी त्यांनी अतिवृष्टीग्रस्त काही गावांना भेटी देऊन पाहणी केली. काटी, कासा, निलागोंदी, धापेवाडा, लोधीटोला, महालगाव, चांदोरी-खुर्द, बघोली, घाटकुरोडा या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पटेल यांनी चर्चा केली. प्रशासनाच्या सर्वेक्षणावर बहुतांश शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पटेलांनी प्रशासनाने तयार केलेला हा अहवाल अंतिम नाही. आपण सरपंचांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानीचा सव्र्हे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनामार्फत आपल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले जाईल. मी केंद्र, तसेच राज्य शासनाकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले. काटी, तसेच लोधीटोला येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी संपूर्ण गाववासीयांच्या व्यथा ऐकून नुकसानीची माहिती घेतली. महालगाव येथे नाल्यामुळे वाहून खरडून गेलेल्या शेताची पाहणी केली. चांदोरी-खुर्द येथे वैनगंगा, तसेच बावणथडी नदीच्या संगमाचे पाणी गावाला धडक देत असल्याने त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. घाटकुरोडा येथील नाल्यामुळे खरडून वाहून गेलेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. नाल्याच्या पाण्याचा फटका बसलेल्या शक्य तेवढय़ा जमिनीचा समावेश करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या वेळी पटेलांसोबत आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बन्सोड, विनोद हरिणखेडे, देवेंद्रनाथ चौबे, कुंदन कटारे, नरेंद्र तुरकर, डॉ.सुशील रहांगडाले, डॉ. योगेंद्र भगत, सभापती वाय. टी. कटरे, छबीलाल पटले, घनश्याम मस्करे, राजलक्ष्मी तुरकर, बुटी रहांगडाले, प्रेम रहांगडाले, गणेश बरडे, गावांचे सरपंच, उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, कृषी अधिकारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू – पटेल
या जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाविषयी प्रशासनाने तयार केलेला अहवाल अंतिम नाही. प्रशासनाने घाईगडबडीत नुकसानीचा अहवाल तयार केल्याने आपण चिंताग्रस्त आहोत.
First published on: 17-08-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior level effort for farmers suffer losses in heavy rain praful patel