मुरमाडी गावातील तीन निष्पाप बहिणींचे हत्याकांड होऊन त्यांचे मृतदेह मिळून १३ दिवस लोटले मात्र अद्यापही आरोपी मोकाटच असल्याने स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या संस्थापिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सीमा साखरे आणि माहेर संस्थेच्या अरुणा सबाने यांनी संताप व्यक्त केला असून घटनेचे गांभीर्य बाजूला राहून राजकीय नेत्यांचा त्याठिकाणी केवळ धुमाकूळ सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शुक्रवारी सीमा साखरे आणि अरुणा सबाने यांनी मुरमाडीला भेट दिली. त्या उपोषणाला बसण्याच्या तयारीत होत्या. मात्र, त्याठिकाणी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी ‘क्लू मिळाला असून लवकरच आरोपींना अटक करू. दोन दिवस वेळ द्या’, अशी विनंती डॉ. सीमा साखरे यांना केली होती. मात्र, दोनाचे चार दिवस होऊनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने सीमाताई म्हणाल्या, तपास जैसे थे असून घटनेचे गांभीर्य बाजूला सारून राजकीय वळणे घेतली जात आहेत. अद्यापही तीन निष्पाप जिवांची हत्या करणारे आरोपी पकडले जात नाहीत, यावरूनच पोलिसांचा निष्काळजीपणा लक्षात येतो.
अरुणा सबाने म्हणाल्या, मुरमाडीला तपास कमी आणि राजकीय लोकांचा केवळ धुमाकुळ सुरू आहे. नेत्यांमध्ये कोण आधी जातो अशी स्पर्धा सुरू आहे. बोरकर कुटुंबीयांनी तक्रार करण्याच्या पहिल्या दिवसापासून पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवला असून दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही त्यांनी काहीही हालचाली केल्या नाहीत. मुरमाडी हे गाव काही आडमार्गी नसून पोलिसांनी वेळीच सूत्रे हलवली असती तर आरोपी हाती आले असते. मुरमाडीची घटना होऊन आठच दिवसांनी लाखांदूरमध्ये एक शिक्षक विद्यार्थिनीवर बलात्कार करतो, याच जिल्ह्य़ात ९ विद्यार्थिनींचा विनयभंग केला जातो, याचा अर्थ त्या भागातील पोलिसांचा धाक कुणालाही राहिलेला नाही, हेच स्पष्ट होते. त्यामुळेच तिघी बहिणींचा खुनी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार, असे सबाने म्हणाल्या. दिल्लीपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटले असले तरी प्रत्यक्ष तपासात कोणतीही प्रगती न झाल्याने पोलिसांची तपास यंत्रणा पुरती हादरली आहे. आता सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपविला जाण्याची दाट शक्यता आहे. तिन्ही बहिणींच्या आईच्या सांत्वनेसाठी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत.
आतापर्यंत गृहमंत्री आर.आर. पाटील, रोहयो मंत्री नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री वर्षां गायकवाड, पर्यटन राज्यमंत्री रणजित कांबळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, यांच्यासह भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि बऱ्याच राजकीय नेत्यांनी मुरमाडीला भेट दिली आहे. अनेक संघटनांची पत्रकबाजी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांतर्फे कँडल मार्च, मशाल मोर्चे काढण्याचे सत्र सुरू आहे. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहता हा राजकीय धूमाकूळ तातडीने थांबला पाहिजे, असे डॉ. सीमा साखरे यांचे मत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा