विद्येची देवता सरस्वतीचे तीर्थक्षेत्र अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील बासर येथे रविवारी मध्यरात्री तिहेरी हत्याकांडाचा प्रकार घडला. या प्रकारामुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर आंध्र पोलिसांसह सीमावर्ती भागातील धर्माबाद पोलीस ठाण्यालाही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या सीमेपासून १३ किलोमीटर अंतरावर बासर हे ठिकाण आहे. विद्य्ोची देवता सरस्वतीदेवीचे तीर्थक्षेत्र अशी देशभर ओळख असलेल्या बासर येथे घडलेल्या या हत्याकांडाने सीमावर्ती गावांत जनतेची झोप उडाली. बासरच्या शारदानगर परिसरात राहणारे अशोककुमार यांचे मंदिरालगतच श्रीवाणी पूजा सेंटर हे पूजा-अर्जाचे साहित्य विक्रीचे दुकान आहे. अशोककुमार (५४) हे पत्नी सुवर्णा (४५), मोठा मुलगा मणिकंठा (२५) व हैदराबाद येथे शिक्षण घेत असलेला शरच्चंद्र (१४) असे चौघे घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोरांनी अशोककुमार यांच्या कुटुंबीयांवर अत्यंत नियोजनबद्ध हल्ला केला. अशोककुमार, पत्नी सुवर्णा व मणिकंठा यांना यात आपले प्राण गमवावे लागले. हल्ल्यात जखमी झालेला शरच्चंद्र याला हैदराबाद येथे हलविले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मध्यरात्री घडलेला हा प्रकार आंध्र पोलिसांना उशिरा समजला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने महाराष्ट्र सीमेवर असलेल्या मंगल कार्यालयापर्यंत मार्ग दाखवला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून एखाद्या वाहनाने पसार झाले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.
तिहेरी हत्याकांडाची घटना आंध्र प्रदेशात घडली असली, तरी रात्री धर्माबाद पोलिसांनी नाकाबंदी केली. धर्माबादचे सर्वच पोलीस कर्मचारी व अधिकारी रात्रभर रस्त्यावर होते. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकले. पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे आंध्र-महाराष्ट्र सीमेवर खळबळ उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा