ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर यांसारख्या शहरांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर चोरटय़ांनी आपला मोर्चा आता टिटवाळा या गणपतीच्या गावाकडे वळवला आहे. टिटवाळ्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडय़ा, चोऱ्यांचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले असून येथील रहिवाशांमध्ये त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून सुसाट वेगाने येत सोनसाखळ्या चोरीच्या घटना तर टिटवाळ्यात दररोज घडू लागल्याने महिला वर्गातही नाराजीचा सूर आहे. टिटवाळ्यातील वाढती लोकवस्ती, तुटपुंजे पोलीस यामुळे येथील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र निर्माण झाले
आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच ठाण्यासह जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये चोर, दरोडेखोरांनी अक्षरश धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. ठाणे शहरात सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक पोलीस दलाच्या कार्यपद्धतीविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत असतानाच जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील चित्रही फारसे वेगळे नाही. कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांच्या मध्यभागी व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना लुटीचे प्रकार घडल्यांतर गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलीस आयुक्तांनी या भागात गस्त वाढवली आहे. असे असताना चोरांनी आता टिटवाळ्याच्या दिशेने आपला मोर्चा वळविल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. टिटवाळ्यातील धनश्री धनंजय दलाल या रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवले. याच भागातील विघ्नहर्ता इमारतीमधील योगेश गोटे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा दिवसाढवळ्या तोडून चोरटय़ांनी दोन लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला. टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांचे प्रमाण बरेच मोठे असून या ठिकाणी भाडय़ाने राहणाऱ्यांची कोणतीही ठोस माहिती पोलिसांकडे नसते, असे चित्र आहे. याच भागातून चोरांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून केल्या जात असल्या तरी या वाढत्या बांधकामांवर अंकुश ठेवणार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

Story img Loader