चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या अभ्यासवर्गाला ज्येष्ठ नेत्या आमदार शोभा फडणवीस यांची गैरहजेरी पक्षाच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, त्यांच्या गैरहजेरीची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे, तर खासदार हंसराज अहीर व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मतभेद असल्यानेच त्या अभ्यासवर्गात सहभागी झाल्या नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भारतीय जनता पक्षाने मिशन-२०१४ कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे अभ्यासवर्ग आयोजित केले आहेत. त्यानुसार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात २१ व २२ सप्टेंबरला बुरडकर सभागृहात राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन केले होते. २१ सप्टेंबरला सायंकाळी या अभ्यासवर्गाचे उद्घाटन खासदार जावडेकर यांच्या हस्ते झाले. खासदार हंसराज अहीर, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाध्यक्ष आमदार प्रा. अतुल देशकर, आमदार नाना शामकुळे, तसेच पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अभ्यासवर्गाला हजेरी लावली. त्याला अपवाद केवळ ज्येष्ठ नेत्या आमदार शोभा फडणवीस यांचा होता. सलग दोन दिवस चाललेल्या या अभ्यासवर्गात त्या एकही दिवस हजर राहिल्या नाही. त्यांची गैरहजेरी आता पक्षाच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
खासदार हंसराज अहीर व आमदार शोभा फडणवीस यांचे हाडवैर राजकारणात सर्वश्रृत आहे, तर माजी प्रदेशाध्यक्ष आमदार मुनगंटीवार बल्लारपूरचे आमदार झाल्यापासून त्यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून फडणवीस यांनी सातत्याने मुनगंटीवार यांच्या तक्रारी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मुनगंटीवार यांनी एखाद्या साध्या कार्यक्रमाचे आयोजन केले तरी त्याला विरोध करायचा इतक्या विकोपाला ही भांडणे गेलेली आहेत. दोन नेत्यांमधील ही भांडणे स्थानिक पातळीवर असती तर एकदाचे समजून घेता आले असते, परंतु त्यांनी भाजपच्या केंद्रीय व राज्य समितीकडेही तशा तक्रारी केलेल्या आहेत. खासदार अहीर आणि फडणवीस गेल्या कित्येक वर्षांंपासून पक्षात एका व्यासपीठावर आलेले नाहीत. आता भाजपच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर मिशन-२०१४ हा उपक्रम राबविला जात असतांना किमान ज्येष्ठ नेत्या म्हणून त्यांनी हजेरी लावणे अपेक्षित होते, परंतु त्या मुद्दाम गैरहजर राहिल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.
फडणवीस यांचा अहीर व मुनगंटीवार यांच्याशी बेबनाव असला तरी अभ्यासवर्गाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हाध्यक्ष आमदार प्रा. अतुल देशकर व आमदार नाना शामकुळे यांच्याकडे होती. या अभ्यासवर्गाचे फडणवीस यांना आठवडाभरापूर्वीच निमंत्रणही देण्यात आले होते, परंतु तरीही त्या गैरहजर राहिल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. भाजपच्या आमदार म्हणून त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद भूषविले आहे. चार वेळा मूल-सावली मतदार संघाच्या आमदार राहिलेल्या फडणवीस सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. पक्षाने सर्व पदांवर व लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतरही ज्येष्ठ नेतेच जर असे बेजबाबदार पध्दतीने वागत असतील तर त्यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून कारवाई करण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे. केवळ अभ्यासवर्गच नाही, तर त्याच सायंकाळी खासदार जावडेकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेलाही त्या गैरहजर होत्या. केवळ अहीर व मुनगंटीवार यांच्याशी मतभेद असल्यामुळेच त्यांनी या अभ्यासवर्गाकडे पाठ फिरवल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, फडणवीस या शरिराने भाजपात असल्या तरी मनाने कॉंग्रेसी आहेत. कारण, त्यांचे सर्व सख्खे शेजारी कॉंग्रेस पक्षात आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा