पंढरीच्या वारीप्रमाणे आमची विकासाची वारी सुरू आहे. यामध्ये अनेक वारकरी येतात जातात मात्र, विकासाचे काम अखंड सुरू आहे. या पाठीमागे मला विधानसभेत सतत पाठविणाऱ्या मतदारसंघातील जनतेचे योगदान महत्त्वाचे वाटते. सर्वसामान्य माणसामध्येच मी विठ्ठल तर भगिनींमध्ये रुक्मिणी पाहात काम करीत आल्यानेच लोहचुंबकाप्रमाणे लोक मला चिकटले असल्याचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सांगितले.
विंग (ता. कराड) येथील कार्यक्रमात आमदार उंडाळकर समर्थकांनी जोरदार राजकीय टोलेबाजी करत निवडणुकपूर्व प्रचाराचे फटाके फोडले. आमदार उंडाळकरांनी ही कोंबडं किती झाकलं तरी आरवायचे राहत नाही, असे सांगत समर्थकांच्या राजकीय टोलेबाजीला दाद दिली. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्या पाठोपाठ विधानसभा होणार आहे. त्या बाबतचा पक्ष काय तो निर्णय घेईल मात्र, कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
विंग येथील १० लाख रुपये खर्चाच्या लक्ष्मी मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्घाटन व वेताळनगर येथील सभामंडप कामाचे भूमिपूजन आमदार उंडाळकर यांचे उपस्थित पार पडले. त्या वेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, बोलत होते. सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याने भाषणांना चांगलाच रंग चढला. वक्त्यांच्या चौफेर टोलेबाजीने बहरत गेली. सभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णा साखर कारखान्याचे संचालक सर्जेराव लोकरे होते.
आमदार उंडाळकर म्हणाले, की गेली ४० वष्रे मी माझे सहकारी विकासाची दिंडी घेऊन चाललो आहोत. जात, धर्म, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन आमचे हे काम सुरू आहे. जिल्हाभरातील ज्या कार्यकर्त्यांना कोणी ही गॉडफादर नाही अशांना सत्तास्थाने मिळून देत आमची वाटचाल सुरू आहे. कोणतेही श्रेय मी एकटा घेऊ शकत नाही. माझा पक्ष, कार्यकर्त्यांंचे योगदान महत्त्वाचे आहे. मी कधी ही सत्तेला चिकटलो नाही. सत्ता असो वा नसो माझे काम सुरू असून, कार्यर्त्यांचा उगम मतपेटीतून होतो. त्या लोकशाही प्रक्रियेचे समर्थन करणारा मी पुढारी आहे. दांभिक, पैसैवाल्या पुढाऱ्यांचा सत्तेत होणारा शिरकाव ही गंभीर बाब आहे. असामान्य कार्यकर्त्यांनाही आता सोहळे न बनता जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. घरात बायको ऐकत नाही. मात्र कट आऊट लावला की हा पुढारी बनला यांचे आपण कधी मूल्यमापन करणार की नाही असा सवाल त्यांनी केला.
विठ्ठलराव जाधव म्हणाले, की उंडाळकर यांना मंत्री असो व नसो राज्यात विशेष स्थान आहे. सत्तेतून सामान्य माणसाचे नेतृत्व मोडण्याचे त्यांचे काम सध्या सुरू असून, भांडवलदार पैसेवाल्याच्या विरोधात सामान्य माणसाचे नेतृत्व जपण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकसंध व्हावे.
राजेंद्र भिसे म्हणाले, की आमदार उंडाळकर व त्यांच्या समर्थकांना निवडणुका नव्या नाहीत. पाच वष्रे आमची व आमच्या नेत्याची तालीम सुरू असते. पद नाही, सत्ता नाही तरी विलासकाकांच्या बरोबर लोक कसे याचा पोटशुळ या मंडळींना उठला आहे. १९९९ पासून जिल्ह्यात पक्षाची लाज राखण्याचे काम एकमेव काँग्रेसचे आमदार उंडाळकर यांनी केले आहे. ज्याच्या हातात काँग्रेसने सत्ता दिली त्यांचे उद्योग पाहिले, तर या मंडळींनीच पक्षाची बदनामी चालवली आहे. पदावर नसताना ही लाल दिवे वापरण्याचे उद्योग यांचे सुरू आहेत. ही एकंदरीत परिस्थिती पाहता उंडाळकरांना तिकीट मिळणार नाही या मागच्या दाराच्या अफावा असून, काँग्रेसचे उंडाळकर हेच उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष मन्सूर फकीर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर खबाले, पोतलेचे सरपंच अशोकराव पोतलेकर, प्रकाश ताटे, कोयना दूध संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले, भागवत कणसे, अनिल कचरे यांनी सभेत आठव्यांदा विलासकाका उंडाळकरच आमदार आहेत. तिकीट कापण्याचे उद्योग केल्यास यांचा मोठा भडका मतदारसंघात दिसेल असा इशाराही या वेळी बोलताना दिला.
प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई महिपाल यांनी केले. तर आभार अजय शिरवाडकर यांनी मानले. या वेळी विंग पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Story img Loader