परभणी पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सेलू शाखेच्या इमारतीच्या लिलाव प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची विभागीय सहनिबंधकांनी गंभीर दखल घेतली. सहकारी संस्थेच्या विशेष लेखा परीक्षक वर्गास या संदर्भात १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परभणी पीपल्स बँकेवर अवसायक म्हणून नेमणूक झाल्यावर एस. बी. बडे यांनी आपल्या कार्यकाळात भ्रष्ट व मनमानी पद्धतीने कामकाज केल्याचा आरोप करीत बडे यांना निलंबित करण्याची मागणी अॅड. श्रीकांत वाईकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. अवसायक बडे यांनी मोठय़ा थकबाकीदारांकडून कर्जवसुली केली तर नाहीच, पण वसूल केलेल्या कोटय़वधी रुपयांमधून ठेवीदारांचे पैसेही दिले नाही. त्यामुळे अनेक ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले. आपल्या रकमा आज ना उद्या परत मिळतील या आशेवर असलेल्या ठेवीदार व भागधारकांची बडे यांनी मोठी निराशा केली. वसुलीच्या रकमेचा योग्य विनियोग न करता या रकमा बेजबाबदारपणे खर्च करण्यात आल्याचा आरोप अॅड. वाईकर यांनी केला.
परभणी पीपल्स बँकेचे अवसायक संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावत असून बनावट खोटी कागदपत्रे, अहवाल तयार करून सरकारची फसवणूक करीत आहेत, याकडे निवेदनात लक्ष वेधताना बडे यांच्यासह लेखापरीक्षक रोडगे, काकडे यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात अॅड. वाईकर यांनी केली होती. संगणक खरेदी, वाहनभाडे, स्टेशनरी आदींवर झालेल्या अनावश्यक खर्चाचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची सहकार खात्याने दखल घेतली. अॅड. वाईकर यांच्या तक्रारअर्जाची सखोल चौकशी करावी व १५ दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश विभागीय सहनिबंधक औरंगाबाद यांनी विशेष लेखापरीक्षक यांना पत्राद्वारे दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा