राज्याच्या उपराजधानीत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून वाहनतळाअभावी ती रस्त्यावरच उभी ठेवली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी प्रशासनाची कारवाई प्रभावी ठरत नसल्याचेच सध्या चित्र आहे.
लोकसंख्या आणि त्यापेक्षा अधिक वेगाने वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रादेशिक परिवहन खात्याच्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१३ रोजी राज्यात २,१४,८८,१५२ वाहनांची नोंद झाली. त्यापैकी नागपूर शहरात १४,९५,९८८ व नागपूर ग्रामीणमध्ये ९,८०,३३२ वाहनांची नोंद झाली आहे. ७१.९३ टक्के दुचाकींचे प्रमाण होते. मागील ४२ वर्षांत वाहनांच्या संख्येत ६८.९९ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षभरात वाहनांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. लोकसंख्या वाढल्याने शिक्षण व रोजगारासाठी धावाधाव आणि या धावपळीच्या युगात वाहनांची गरज वाढली. अपवाद वगळता प्रत्येक कुटुंबात सरासरी दोन वाहने तरी आहेत. याशिवाय शालेय बस आणि इतर वाहतुकीची तसेच मालवाहू वाहनांची रस्त्यांवर वर्दळ वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरातील रस्ते मात्र तेवढेच आहेत. ही अवस्था पाहता नागपुरात वाहतुकीची स्थिती किती बिकट असेल याचा अंदाज येतो.
सुमारे २५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरातील निवास स्थाने आणि वाहनांची संख्याही वाढली असून रस्त्यावरून मिनिटाला अंदाजे सरासरी शेकडो वाहने रोज धावतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जागाही अपुरी पडू लागली आहे. निवासी आणि व्यावसायिक इमारतीत वाहनतळासाठी जागा सोडणे कायद्यानुसार आवश्यक करण्यात आले आहे. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. अनेक इमारतींमध्ये तशी जागा सोडण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी नकाशात मोकळी जागा असली तरी प्रत्यक्षात त्याचा इतर कामासाठी वापर सुरू असल्याचे दिसते.
वाहनांसाठी जागा आणि पर्यायाने वाहनतळ नगण्यच आहेत. वाहने आपसूकच रस्त्याच्या कडेला लावली जातात. रस्त्यावर दुकानदारांचे आधीच अतिक्रमण झाले आहे. वाहने जास्त व जागा कमी असल्याने दुचाकींसह इतर वाहनांचे दुहेरी, तिहेरी पार्किग केले जाते. झाशी राणी चौक ते आनंद टॉकीज, सदरमधील लिबर्टी टॉकीज ते राजभवनपर्यंतचा रेसिडन्सी रोड, मुंजे चौक ते मेहाडिया चौक, मेयो रुग्णालय ते सतरंजीपुरा हा जुना भंडारा रोड, गांधीबाग उद्यान ते निकालस मंदिर रस्ता, शहीद चौक ते गांधी पुतळा चौक, भंडारा मार्गावरील गोमती चौक ते पारडी नाका रस्ता, सक्करदरा चौक ते छोटा ताजबाग चौक, ऑरेंज सिटी रुग्णालय ते चुनाभट्टी चौक हा देवनगरातील रस्ता, शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक, गांधीसागर ते महाल टिळक रोड, महाल ते गांधी पुतळा केळबाग रोड आदींसह शहरातील अनेक रस्त्यांवरून जाताना हेच चित्र असते.
अवैध वाहनतळांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहतूक पोलीस कारवाई करतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण झोनमध्ये वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात दुचाकींवर ९१४७२ प्रकरणे नोंदवली. वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईड ते हॉटेल मचाण दरम्यान ३३६ वाहने उचलण्यात आली. चारचाकी वाहनांवर पूर्व, पश्चिम व उत्तर झोनमध्ये १२८४२ प्रकरणे नोंदवण्यात आली. नागपुरात केवळ पाचशे वाहतूक पोलीस आहेत. एवढय़ा नगण्य मनुष्यबळाने केलेली ही कारवाई नगण्यच ठरत असल्याचे त्या कारवाईचा प्रभावच पडत नाही. शहरातील रस्त्यांच्या रुंदीत वाढ केली जात नाही. बडकस चौक व सीताबर्डी परिसराचा अपवाद सोडला तर अनेक बाजारपेठ परिसरात वाहनतळेच नाहीत. महाल व बर्डी परिसरातही वाहनतळे पुरेशी नाहीत. त्यामुळे तेथील वाहनतळाचा प्रश्न गंभीरच आहे. लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वेगाने वाढत असताना वाहनतळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांचेही सहकार्य त्यासाठी आवश्यक ठरले आहे.
वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ, शहरात वाहनतळे मात्र नगण्यच
राज्याच्या उपराजधानीत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून वाहनतळाअभावी ती रस्त्यावरच उभी ठेवली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
First published on: 01-05-2015 at 02:02 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious parking issue in nagpur city