तुम्ही शांत, स्वस्थ झोपत नसाल तर खबरदार.. कारण, आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आता निद्राविकारानेही डोके वर काढले असून यामुळे झोपेतच मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात लठ्ठ व्यक्ती आणि झोपेत घोरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सात टक्के लोकांचा मृत्यू होत असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी भारतात यावर फार संशोधन झाले नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
झोपेतच असताना श्वासोच्छवास बंद होणे आणि त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन आणि कॉर्बनडाय ऑक्सिाईडचे प्रमाण अव्यवस्थित होणे, या अवस्थेला ‘स्लिप अॅप्निआ’ (झोपेचा आजार) असे म्हटले जाते. अशा व्यक्तीला व्यवस्थित श्वासोच्छवास करता येत नाही. कारण, त्या व्यक्तीच्या हवा आत जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झालेला असतो. घशाचे आणि जिभेचे स्नायू शिथील झाल्यामुळे आणि ते प्रसरण पावल्यामुळे किंवा त्यांच्या आकारात बदल झाल्यामुळे झोपेत असताना हवेचा मार्ग निमुळता होऊ शकतो. स्लिप अॅप्निआ झालेला व्यक्ती १० किंवा त्यापेक्षा अधिक सेकंदासाठी आणि एका तासात पाच वेळा श्वासोच्छवास बंद करतो. या दरम्यान त्याचा श्वासोच्छवास दोन मिनिटे व त्याहून अधिक वेळ बंद झाला तर त्यातच त्याचा मृत्यू होतो. भारतातील ७ टक्के लोकांचा या आजाराने मृत्यू होतो, असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु भारतात यावर संशोधन अजूनही झालेले नाही. हे संशोधन मी स्वत: करत असल्याची माहिती निद्रारोग तज्ज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
हा आजार असलेल्यांपैकी २० टक्के व्यक्ती घोरतात. पन्नाशीच्या आधी त्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक दिसून येते. स्थूलपणा असलेल्यांपैकी ७० टक्के लोकांमध्ये, तर हृदयविकार असलेल्यांपैकी ३० टक्के रुग्णांना हा आजार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
उपचारांमुळे स्लिप अॅप्निआ बरा होऊ शकतो. सर्वच आजारी व्यक्तींसाठी एकाच प्रकारची उपचार पद्धती नाही.
कारण, प्रत्येकावरील उपचार हे त्याच्या आजाराच्या स्वरूपावर आणि त्या व्यक्तीच्या स्लिप अॅप्निआच्या लक्षणांवर अवलंबून असतात. वजन कमी करणे, हा यावर एक सर्वात महत्त्वाचा उपचार आहे.
प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्यांनी केवळ १० टक्के जरी वजन कमी केले तरी त्यांच्या स्लिप अॅप्निआच्या प्रमाणात घट होते आणि आश्चर्यकारकपणे त्यांना रात्री व्यवस्थित झोपही लागते. त्याचबरोबर धूम्रपान, मद्यपान, झोपेच्या गोळ्या वज्र्य केल्याने झोपेची वेळ नियमित केल्याने स्लिप अॅप्निआ नियंत्रणात राहू शकतो. स्लिप अॅप्निआपासून मृत्यूचा धोका असतानाही केवळ १० टक्केच व्यक्ती उपचार करून घेतात. त्यामुळे याबद्दल जनजागृती होणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.
घोरण्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. ज्यांना ही सवय आहे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो, झोप व्यवस्थित होत नाही त्यांनी त्वरित निद्राविकार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार करून घेणे गरजेचे आहे. त्यांची एका यंत्राद्वारे तपासणी केली जाते. त्यानंतर उपचाराची पुढील दिशा ठरवली जाते. सध्या तरी या आजारावर औषधोपचार नाहीत. शस्त्रक्रिया करणे किंवा यंत्र लावून झोपणे, हेच उपचार असल्याचेही डॉ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.
निद्रादोषाचे परिणाम
* दिवसा झोप येणे
* रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होणे
* शरीराची कार्ये अव्यवस्थित होणे
* कार्यक्षमतेत घट होणे
* नकारात्मक मानसिकता आणि चिडचीड होणे
* वजनवाढ आणि स्थूलपणा
* स्मरणशक्ती कमी होणे
* हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येणे