उरणमधील विनायक काठे आळीमध्ये नाल्याचे काम सुरू असताना काम करणाऱ्या मजुराने टिकावाने खोदकाम करीत असताना अजाणतेपणी एका बिळावर घाव घातला असता त्यातील नागाला(कोब्रा)जखम झाली. याची माहिती सर्प मित्रांना मिळाल्यानंतर त्यांनी नागाला पकडून उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले. यावेळी जखमी नागावर रुग्णालयातील डॉक्टरांनी जखमेवर टाके मारून त्याला इंजेक्शन दिले. जखम बरी होईपर्यंत त्याला सर्प मित्रांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या सापाचे पोट फाटून आतडीच बाहेर आल्याने त्याच्या पोटावर सात टाके घालण्यात आले आहेत.
माणुसकीला लाजविणाऱ्या व काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत असताना उरणमधील सर्प मित्र रघू नागवेकर यांनी जखमी नागाला जिवदान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी उरणच्या शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोज बद्रे यांनीही पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी अशाच प्रकारे जखमी झालेल्या अतिविषारी घोणस जातीच्या सापावरही बद्रे यांनी उपचार केले होते. निसर्गातील वन्यजीव हे माणसाच्या जीवनात आवश्यक आहेत. मात्र विकासाच्या नावाने अनेक ठिकाणी वन्यजीवांची आश्रयस्थाने असलेली जंगले नष्ट केली जात असल्याने अनेक विषारी तसेच बिनविषारी वन्यजीव लोकवस्तीत शिरू लागले आहेत.
हा नाग सर्वात विषारी असला(कोब्रा)  तरी तो शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सिद्ध झाले आहे. भात शेतीत पिके फस्त करणारे उंदीर हे त्याचे मुख्य भक्ष्य असते.
 त्यामुळे शेतीच्या परिसरात नाग आढळून येतो. तो उंदीर खात असल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान टळते. त्यामुळे तो शेतकऱ्याचा मित्र म्हणूनच त्याची ओळख असली तरी विषारी असो वा बिनविषारी साप दिसला की मारा त्याला अशी सर्वसाधारण भावना असल्याने अनेक वन्यजीव मारून नष्ट केले जात आहेत.
अशा वेळी सर्प मित्र असलेल्या नागवेकरसारखे तरुण जखमी वन्यजीवांना जिवदान देण्यासाठी जिवाचा धोका पत्करून पुढे येत असून वन्यजिवांची हत्या करू नका, त्याची माहिती आम्हाला द्या, आम्ही त्यांना वाचवून पुन्हा एकदा जंगलातील त्याच्या घरी सोडू अशी जनजागृती केली जात आहे.
यासाठी माणसांचे डॉक्टर असलेल्या डॉ. बद्रे यांनी या वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली असून आतापर्यंत गरूड,साप यांच्यावर त्यांनी उपचार केले आहेत.

Story img Loader