अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयात गैरहजर असलेल्या बाळापूर येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेषराव नरवाडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तर याच रुग्णालयात कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या डॉ. मोहन अकोले यांना सेवेतून मुक्त करण्याबाबत अहवाल आरोग्य विभागाचे संचालक यांना पाठविण्यात आला. कळमनुरी तालुक्यात मंगळवारी झालेल्या अपघाताबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटून जमावाने रुग्णालयात तोडफोड केली व अधिकाऱ्यांना मारहाण केली. या पाश्र्वभूमीवर तातडीने वरील पावले उचलण्यात आली. आखाडा बाळापूर येथील या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने अपघातातील जखमींचा मृत्यू झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. या वेळी पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांना धक्काबुक्की, तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यास मारहाण केली. या प्रकरणी रुग्णालयात गैरहजर असलेले डॉ. शेषराव नरवाडे यांची तत्काळ बदली व डॉ. मोहन अकोले यांना सेवेतून कमी करून रिक्त जागेवर नवीन नियुक्ती करावी, असा प्रकारचा अहवाल डॉ. अरुण बनसोडे यांनी वरिष्ठांना पाठविला. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करताना तालुका आरोग्य अधिकारी, रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. संबंधित दोन्ही डॉक्टर गैरहजर होते. त्यामुळे गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव डॉ. बनसोडे यांनी आरोग्य संचालक व आरोग्य उपसंचालक यांच्याकडे बुधवारी पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा