पन्नास हजारावर उत्साही प्रेक्षकांच्या साक्षीने पार पडलेल्या महासंग्राम चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी स्थानिक पाटाकडील तालीम संघावर (पीटीएम) सेसा-गोवा संघाने ३ विरुध्द शून्यने एकतर्फी मात करत विजेतेपद पटकाविले. सेंटर फॉरवर्डचा खेळाडू चिकोडी याने कालच्या प्रमाणे आजही विक्रमी हॅट्ट्रीक गोल नोंदवित गोवा संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला. अंतिम सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. नागपूरच्या ब्लुजवर संघावर मातकरणारा सेसा संघ आणि स्थानिक पीटीएम यांच्या लढतीत कोण बाजी मारतो याकडे नजरा वळल्या होत्या. सेसा-गोवा संघाने चार-चार-तीन-एक अशी आक्रमक रचना लावत स्पर्धेत सुरुवातीपासून वर्चस्व राखले होते. सामन्याच्या पूर्वाधार्थ दोन उत्तार्धात एक असे तीन मैदानी गोल करण्यात आले. आघाडी फळीतील खेळाडूंच्या अप्रतिम पासचे सोने करीत चिकोडीने संघाचा विजय निश्चित केला.     
विजेत्या संघास १ लाख रुपये तर उपविजेत्या संघास ५० हजार रुपये देण्यात आले. स्पर्धेतील सवरेत्कृष्ट म्हणून शैलेश पाटील (पीटीएम) याच्यासह सेसा-गोवा संघातील योगेश कदम, चिकोडी, के.परेशव जयगणेश यांना तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून रोहित निंबाळकर यांना गौरविण्यात आले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवाडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जयेश कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सतीश सूर्यवंशी राजू वेठे यांनी महासंग्रामचे आयोजन केले होते. अंतिम सामन्यास महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
कदम, चिकोडी चमकले
महासंग्राम चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सेसा-गोवाकडून खेळणारा योगेश कदम व चिकोडी यांचा खेळ चांगलाच बहरला. मुळचा करवीर तालुक्यातील असणारा योगेश कदम पूर्वी खंडोबा, फुलेवाडी संघातून खेळत असे. आता सेसा-गोवा संघातून तो नाव कमावत आहे. कालच्या सामन्यात चमकदार कामागिरी करीत त्याने सामनावीरचा मान मिळविला होता. या संघाचा चिकोडी हा प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. उपांत्य व अंतिम अशा दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात हॅट्ट्रीक नोंदवित त्याने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.