खान्देशातील जळगाव येथेच ‘सेट’ परीक्षा केंद्र असल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने धुळे येथे सेट परीक्षा केंद्र मंजूर केले आहे.
राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्याथ्याता म्हणून पात्र ठरविण्यात येते. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय संबंधीत विद्यापीठाकडून त्यांना मान्यता मिळत नाही. खान्देशात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील परीक्षार्थीना सेट परीक्षा देण्यासाठी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जावे लागते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाल्यापासुन धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जळगाव वगळता इतरत्र सेट परीक्षेचे केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती.
यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी आ. प्रा. शरद पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांची प्रत्यक्ष भेट घेवून आ. पाटील यांनी हे केंद्र धुळे येथे होण्याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेतही चर्चा केल्यानंतर केंद्र मंजुरीसंदर्भात निर्णय घेण्यात आला धुळे येथे परीक्षा केंद्र मंजूर झाल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक व मानसिक त्रासातून सुटका होणार आहे. भविष्यात राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) केंद्रही धुळे किंवा जळगाव येथे व्हावे, यासाठी आ. पाटील यांच्याकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत.