कोणतीही निवडणूक खरे तर मुद्दय़ांवर लढली जायला हवी ही सर्वसामान्य अपेक्षा असते. ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मुद्दय़ांपेक्षा वेगवेगळ्या घोषवाक्यांची स्पर्धा एकीकडे रंगली असताना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा रोख थेट ‘सेटिंग’च्या छुप्या चर्चेकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने निवडणुकीत दररोज नवे रंग भरू लागले आहेत. निवडणुकीचे डावपेच आखताना प्रतिस्पध्र्याच्या गोटात चलबिचल निर्माण होईल, अशा कहाण्यांची पद्धतशीरपणे पेरणी केली जात आहे. कल्याणात ‘िशदेशाही’ टिकविण्यासाठी ठाण्यात ‘डाव-खरे’ केले जातील, अशा स्वरूपाचा छुपा प्रचार गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच ठाण्यात ‘बंटीच वाजवेल तुमची घंटी’, असा प्रतिहल्ला दुसऱ्या गटाकडून केला जात आहे. एकंदरीत प्रचारात मुद्दय़ांपेक्षा ‘सेटिंग’ची चर्चाच अधिक रंगू लागली आहे.
कल्याणची मोहीम काहीशी अवघड बनल्याने महिनाभरापासून
शिवसेनेचे ठाणे संपर्कप्रमुख एकनाथ िशदे यांचे ‘ठाणे दर्शन’ दुर्लभ झाले आहे. त्यामुळे या प्रचाराने आणखी जोर धरला असतानाच कल्याणात आणि विशेषत: उल्हासनगरात शिवसेनेसोबत असलेल्या जुन्या मैत्रीचा ‘वसंत’ बहरेल, अशी चर्चा जोमाने सुरू झाली आहे. या चर्चेला जोर मिळावा यासाठी दोन्ही बाजूंकडून काही दावे-प्रतिदावे केले जात असल्याने या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत दिसू लागले आहे. या छुप्या चर्चेचा रोख ‘ठाणे सोडले-कल्याण दिले’ अशा पातळीवरही पोहोचला आहे. संघटनात्मक पातळीवर विरोधी पक्षाच्या गोटात शैथिल्य आणण्यासाठी ही ‘पेरणी’ केली जात असल्याची चर्चा असली तरी ती खोडून काढण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांपुढे उभे ठाकले आहे.
ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ एकनाथ
िशदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचे मानले जातात, मात्र कल्याणच्या मोहिमेवर खाचखळगे वाढल्याने एकनाथ िशदे यांचा अर्धाअधिक वेळ तेथेच खर्ची पडतो, असे एकंदर चित्र आहे. ठाण्यात पूर्वी इतका वेळ देता येणार नाही हे लक्षात येताच िशदे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथील उमेदवार राजन विचारे यांना विशेषाधिकार बहाल करत नव्या नियुक्त्या करण्याचे सूचना दिल्या. विचारे यांच्या प्रचारात ठाण्यातून जोश निर्माण व्हावा, असा त्यामागील उद्देश होता. मात्र नव्याने नियुक्त केलेले शाखा, उप-शाखाप्रमुखही कुर्निसात ठोकायला कल्याणच्या दिशेने जाऊ लागल्याने मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाऊ लागला आहे. नवी मुंबईसारख्या नाईकांच्या बालेकिल्ल्यात संघटना चालते, पण ठाण्यात नाही, या चिंतेच्या मुळाशी ‘सेटिंग’ची चर्चाच अधिक असल्याचे बोलले जाते. ठाण्याप्रमाणे कल्याणमध्येही विरोधी गटाला नामोहरम करण्यासाठी उल्हासनगरात मैत्रीचा ‘वसंत’ बहरणार, असा प्रचार सुरू आहे. विरोधी गटाच्या प्रचारातील ‘आनंद’ ओसरावा यासाठी ही खेळी असल्याची चर्चा असतानाच ठाण्यातही ‘बंटी के हाथ तीर-कमान’ असा नवा फंडाही काही ठिकाणी चालविला जात आहे.
एकनाथ िशदे हे आमच्या पक्षाचे सेनापती असून त्यांच्या मदतीनेच
आपण ठाण्यावर भगवा फडकविणार असल्याचा दावा राजन विचारे यांनी केला. विरोधकांना पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच नको त्या अफवा पसरविण्याकडे त्यांचा कल दिसतो आहे, असा टोलाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना लगाविला.
ठाणे, कल्याणात‘सेटिंग’चीच अधिक चर्चा
कोणतीही निवडणूक खरे तर मुद्दय़ांवर लढली जायला हवी ही सर्वसामान्य अपेक्षा असते.
First published on: 18-04-2014 at 06:46 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Setting on upcoming election in thanekalyan