शाळकरी विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या कारणावरून जुन्या नाशिकमधील कथडा परिसरात बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीचे रूपांतर दंगलीत झाले. परंतु पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना शांततेचे आवाहन केले. अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी संवेदनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी उपस्थितांकडून करण्यात आली. दरम्यान, दंगल प्रकरणात पाच संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे.
कथडा परिसरातील विद्यार्थिनीच्या छेडछाडीचे प्रकरण बुधवारी सकाळी घडल्यानंतर या वादात दोन्ही गटांची समजूत घालण्यात आल्याने हे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच रात्री पुन्हा वाद निर्माण झाला. त्याचा फायदा घेत समाजकंटकांनी परिसरात रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. काही वाहनांना आग लावून देण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिकांनी पटापट दुकाने बंद केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त साहेबराव पाटील, सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक धनराज दायमा त्वरीत घटनास्थळी उपस्थित झाले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. दंगलीच्या पाश्र्वभूमीवर गुरूवारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत उपस्थितांकडून काही महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या. त्यात धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर होऊ नयेत यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, संवेदनशील परिसरात असलेली राजकीय संपर्क  कार्यालये हटविण्यात यावीत, परिसरात ठिकठिकाणी टाकण्यात आलेले बाक काढून घ्यावेत जेणेकरून टवाळखोरांचा उपद्रव काही अंशी कमी होईल, कथडा परिसरात उंचावर असलेल्या महालक्ष्मी पोलीस चौकीचा उपयोग फारसा होत नसल्याने अमरधाम रस्त्यावर पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, प्रत्येक मंडळातून एक व्यक्ती हा पोलीस मित्र म्हणून घेण्यात यावा, या सूचनांचा समावेश आहे.
परिसरात १० पोलीस तैनात करण्याचे आश्वासन या वेळी देण्यात आले. दरम्यान भद्रकाली पोलिसांनी संतोष भगवान कहार (३६), गोविंद रामदास कहार (२०), संजय एकनाथ भास्कर (३५), अब्दुल रहिम शेख (१९) आणि शहजाद युसुफ बागवान (३५) या संशयितांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा