लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील ब्रम्हलीन तपोनिधी सिद्धहस्त योगी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांच्या ६५व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक यात्रेस श्री सेवागिरी महाराजांच्या पालखी व झेंडय़ाच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. मिरवणुकीतील श्री सेवागिरी महाराजांचा जयघोष, ढोल-ताशा, लेझीम, तुतारी व झांजपथक यांच्या निनादात मोठय़ा भक्तिमय व उत्साही वातावरणात पुसेगावनगरी दुमदुमून गेली.
श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्री सुंदरगिरी महाराज, देवस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अॅड. विजयराव जाधव, सरपंच शुभांगी जाधव, उपसरपंच संतोष जाधव, सुभाषराव जाधव, माजी उपसरपंच रणधीर जाधव, संदीप जाधव, गुलाबराव जाधव, पृथ्वीराज जाधव, प्रवीण जाधव, संजय जाधव, अंकुश पाटील, दिलीप बाचल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभात मंगलसमयी श्री सेवागिरी महाराजांचा मानाचा झेंडा व पालखीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली. पूजनानंतर झेंडा व पालखीच्या मिरवणुकीने उत्साहात प्रस्थान केले.
मानाचा झेंडा व पालखी मिरवणुकीसमोर श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्री सेवागिरी विद्यालय, कला वाणिज्य महाविद्यालय, इंदिरा गांधी कन्या प्रशाला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल, सेवागिरी इंग्लिश मीडियम स्कूल, शासकीय विद्यानिकेतन या शाळांचे विद्यार्थी तसेच त्यांचे झांजपथक व लेझीम पथक सहभागी होती.
श्री सेवागिरी विद्यालय व श्री हनुमानगिरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी चौकात सादर केलेले पारंपरिक गजीनृत्य हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा महादेवाच्या पिंडीवरील शपथविधीचा देखावा दिमाखात सादर केला. विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींचे पोशाख परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोचविण्याचा प्रयत्न केला.
श्री सेवागिरी महाराजांच्या मानाचा झेंडा व पालखीचे मोठय़ा श्रद्धेने भाविक दर्शन घेत होते. यात्रास्थळावर श्री सेवागिरी महाराजांच्या मानाच्या झेंडय़ाची प्रतिष्ठापना मठाधिपती श्री सुदरगिरी महाराज व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. झेंडा व पालखी मिरवणूक सुमारे अडीच ते तीन तास सुरू होती. या वेळी माजी सरपंच बाळासाहेब जाधव, शिवाजीराव जाधव, बजरंग देवकर, बाबूराव जाधव, विजय जाधव, विजय पवार, दिलीप उणउणे, रमेश देवकर यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन व चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा