सेवाग्राम आश्रमाच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्य हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पावनस्थळ करण्याच्या हेतूने ३०० कोटी रुपये खर्चाचा ‘गांधी फॉर टुमारो’ हा प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली. 
महात्मा गांधींजींचे सर्वसमावेशक विचार भावी पिढीपुढे ठेवण्याचा मुख्य हेतू या प्रकल्पामागे आहे. पहिल्या टप्प्यात दहा एकर जागेवर हा प्रकल्प होईल. जागतिक स्तरावर नेल्सन मंडेला, अब्राहन लिंकन व रविंद्रनाथ टागोर यांच्या विचारानुरूप असे प्रकल्प झाले आहेत. दहा एकर जागा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये खर्चून गांधीजींच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यावर त्याअंतर्गत प्रकाश टाकण्यात येणार आहे, असेही भोज यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी म्हणून भोज यांची बदली झाली असून, त्या उत्तरप्रदेशात प्रतिनियुक्तीवर जात आहेत. यावेळी दीड वर्षांच्या कलावधीचा आढावा त्यांनी सादर केला. गांधीजींवर आधारित प्रकल्प हा आपला ड्रीम प्रोजेक्ट होता, असे नमूद करीत त्या म्हणाल्या की, अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. आधार कार्डाच्या नोंदणीत राज्यात वर्धा जिल्हा अव्वल असून केंद्रशासनाने विविध योजनांसाठी वध्र्याला पायलट प्रोजेक्ट म्हणून पुरस्कृत केले आहे. महात्मा गांधी नरेगा योजनेत वर्धा उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्यात ओळखला जातो. जिल्ह्य़ाची पंतप्रधान पदकासाठी राज्य शासनाने शिफोरस केली आहे. श्रीमती भोज यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून मूळचे चेन्नईचे एन.नवीन सोना यांनी पदभार स्वीकारला. २००० च्या बॅचचे अधिकारी असलेले सोना हे अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर असून रत्नागिरी येथून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. औरंगाबादला विक्रीकर आयुक्त, अमरावतीला अप्पर आयुक्त व नागपूरला वस्त्रोद्योग संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. जिल्हा प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने उपयोग करण्याचा मानस त्यांनी पदभार स्वीकारताना व्यक्त केला. जीआयएस बेस ही प्रणाली लागू करणार असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sevagram will creat international standard gandhi for tomorrow programme