मध्य रेल्वेच्या सात प्रमुख रेल्वे स्थानकांची आयएसओच्या मानांकनानुसार स्वच्छता राखण्यासाठी एक सूची लवकरच तयार करण्यात येणार आहे. या मध्ये सर्व टर्मिनस स्थानकांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके बनविण्यासाठी मध्य रेल्वेने काही स्थानकांची निवड केली असून त्यांची स्वच्छता ही जागतिक दर्जाप्रमाणे करण्यात येणार आहे. त्यासाठी खास सूची तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात स्वच्छतालये, फलाटांवरील स्वच्छता, खानपान सेवा, पिण्याच्या पाण्याची तसेच सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था आदींचा समावेश आहे. या स्थानकांवर स्वच्छतेबरोबरच वैद्यकीय सुविधा, व्यापारी सुविधा देण्याचाही विचार होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा ज्या स्थानकांवरून सुटतात आणि जेथे सर्वाधिक गर्दी असते अशा प्रमुख स्थानकांची निवड करण्यात आली आहे. या स्थानकांवर सध्या असलेल्या सुविधांची स्थिती नेमकी कशी आहे याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. त्यात आणखी आधुनिकता कशी आणता येईल याचाही अभ्यास करण्यासाठी विशेष समिती नेमण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पुणे, नाशिक रोड, नागपूर या स्थानकांचा या योजनेत प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. एका वर्षांंमध्ये अंमलबजावणी करून त्याचा परिणाम पाहून नंतर त्याच्या आधारे अन्य प्रमुख स्थानकांवरही अशा सुविधा देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा