अकोट येथील सहकारी सूतगिरणीत काँग्रेस नेते व माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे व त्यांचे बंधू प्रभाकरराव गणगणे यांनी किमान ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार रामेश्वर कराळे व अ‍ॅड.सुरेंद्र पोटे यांनी केला आहे.
सुरुवातीला या काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती, पण गणगणे यांचे राजकीय वजन पाहून पोलिसांनी त्यांना हात न लावता पाठिशी घातले. हे पाहून कराळे यांनी अकोटच्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे तक्रार केल्यावर न्यायालयाने अकोट पोलीस ठाण्याच्या ठाणेदारास या प्रकरणी ५ मे २०१४ पर्यंत प्रगती अहवाल सादर क रण्याचे आदेश दिले, पण अद्याप या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप आज पत्रकार परिषदेत कराळे व अ‍ॅड.पोटे यांनी केला. अकोटचे पोलीस अधिकारी नीट तपास करीत नाही म्हणून हा तपास त्यांच्याकडून काढून सक्षम यंत्रणेकडे देण्यात यावा व या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी कराळे यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अकोट सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष असतांना सुधाकरराव गणगणे यांनी स्वत:च्या सहीने सूचना फलकावर सूतगिरणी बंद केल्याची सूचना लावली.
विशेष म्हणजे, त्यांनी संचालक मंडळाचा याप्रकरणी कोणताही ठराव घेतला नाही, असा आरोप अ‍ॅड. सुरेंद्र पोटे यांनी एका निवेदनातून केला आहे. अचानक सूतगिरणी बंद केल्यावर कामगारांनी त्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. कामगार न्यायालयापासून तो सवरेच्य न्यायालयापर्यंत या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने कामगारांचे १४ कोटी ८५ लाख रुपये देणे असून ते सूतगिरणीच्या संचालकांनी द्यावे, असे आदेश दिल्याचेही पोटे यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यावेळी सुधाकरराव गणगणे हे या सूतगिरणीचे अध्यक्ष होते. त्यांच्याविरूद्ध लेखापरीक्षण अहवालावरून अकोट पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल केले आहेत तरीही कारवाई नाही, असा आरोप पोटे यांनी निवेदनातून केला आहे. केंद्राच्या वस्त्रोद्योग संचालनालयालाही या प्रकरणी अवगत करण्यात आले आहे,पण कें द्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे या प्रकरणी वस्त्रोद्योग संचालनालयानेही काहीच कृती केली नाही, असे पोटे यांचे म्हणणे आहे. सुधाकरराव गणगणे हे काँग्रेस नेते असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देत आहेत, असा आरोप पोटे व कराळे यांनी केला आहे.
चोराच्या उलटय़ा बोंबा -गणगणे
माझ्यावर अ‍ॅड.सुरेंद्र पोटे व माजी आमदार रामेश्वर कराळे यांनी केलेले आरोप म्हणजे चोरांच्या उलटय़ा बोंबा आहेत, तसेच हा प्रकार शिळ्या कढीला ऊत आणणारा आहे, सुधाकरराव गणगणे यांनी म्टले आहे. त्यांनी राजकीय द्वेषभावनेतून आरोप केलेले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना त्यांनी बोलावयास नको. विशेष म्हणजे, या प्रकरणात कराळे व पोटे यांच्याविरुद्ध आरोप आहेत. ते त्यांनी स्पष्ट करावे, असे सांगून गणगणे म्हणाले, काही दिवसापूर्वी हे दोघेही माझ्याकडे या प्रकरणी तडजोड करण्यासाठी आले होते, पण मी यास नकार दिला म्हणून त्यांनी हे आरोप केले आहेत.
प्रगती अहवाल मुदतीत सादर केला  –  ठाणेदार  
गणगणे बंधुंच्या भ्रष्टाचार प्रकरणातील चौकशीबाबत, तसेच अ‍ॅड.पोटे व कराळे यांनी केलेल्या आरोपांबाबत अकोटचे ठाणेदार नागरे यांना प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही न्यायालयाचा कोणताही अवमान केलेला नाही. न्यायालयाने दिलेल्या मुदतीतच प्रगती अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी चौकशी केली असून अनेकांचे जाबजवाब नोंदविले आहेत. पोटे यांना या सर्व प्रकारची माहिती आहे, असेही ते म्हणाले. पुरावे सादर करा, असे पत्रही पोलीस ठाण्याने माजी आमदार कराळे यांना दिले, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा