एकाचवेळी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावर धम्माल उडवूण देणारा अभिनेता जावेद जाफरी आपल्या आगामी चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सात भूमिकांमध्ये दिसणार आहे. बी. आर. एंटरटेन्मेटच्या ‘मिय जो. बी. काव्‍‌र्हालो’ या चित्रपटात कधी मराठमोळी स्त्री, कधी साधुबाबा तर कधी अ‍ॅफ्रो मॅन अशा चित्रविचित्र सात अवतारांमधला जावेद जाफरी पहायला मिळणार आहे. अर्शद वारसी आणि सोहा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात जावेदच्या या रंगीबेरंगी रूपाने आणखीनच बहार आणली असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
सध्या जावेद जाफरी आपल्या डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘बुगी वुगी’च्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर परतला आहे. मध्यंतरी त्याने रणबीरबरोबर ‘बेशरम’ केला होता. आता लगोलग तो ‘मि. जो. बी. काव्‍‌र्हालो’ या चित्रपटात दिसणार आहे. या प्रत्येक भूमिकेसाठी दररोज जवळपास चार ते पाच तास जावेदला केवळ मेकअपसाठी लागत होते. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर तिवारी यांच्या मते जावेद जाफरीला त्या ‘सतरंगी’ भूमिकांमध्ये पाहणं ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. आम्ही रोज चार ते पाच तास त्यांच्या त्या मेकअपवर लक्ष ठेवून असायचो. एवढा वेळ मेकअपला बसून उठल्यानंतर जावेदभाई थेट आपल्या व्यक्तिरेखेत शिरायचे ते एकदम त्या दिवसाच्या शेवटी जेव्हा आम्ही पॅकअप असे ओरडायचो तोपर्यंत त्यांना आपल्या त्या भूमिकेतून आणि अवतारातून बाहेर येणं मान्य नसायचं.
एकदा तर मराठी स्त्रीची भूमिका करताना त्यांनी दिवसभर आपल्या बेढब आवाजात मराठी बोलून बोलून सगळ्यांना सेटवर हैराण केलं होतं. त्यांच्यासारख्या कलाकाराबरोबर काम करताना मजा आली, असेही समीर तिवारी यांनी सांगितले. तर जावेदचे हा सतरंगी अवतार ‘मि. जो. बी. काव्‍‌र्हालो’ या चित्रपटात
३ जानेवारीपासून दिसणार आहे. तोपर्यंत जावेदभाईंच्या ‘बुगी वुगी’ने छोटा पडदा नक्कीच काबीज केला असेल!

Story img Loader