वाराणसी येथे होणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी राज्यामध्ये ठाणे जिल्ह्य़ातून सर्वाधिक सात प्रकल्पांची निवड झाली असून यंदा शहरी शाळांतील मुलांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून याचा फायदा ग्रामस्थांना होणार असल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच ठाण्यातील सिंघानीया हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा ‘शेंगदाण्याच्या टरफलापासून जळाऊ विटेची निर्मिती व त्याचा कोळसा, शेणाच्या गोवरीबरोबर तुलनात्मक अभ्यास’ हा प्रकल्प राज्यातून प्रथम क्रमांकाचा ठरला आहे. ईशान फणसे, रोहन देशमुख, तरुण के, हृषीकेश रेनोस, भार्गवी मोरे यांनी हा प्रकल्प सादर केला. त्यांना शिक्षिका श्रीदेवी नायर यांनी मार्गदर्शन केले आहे. या वर्षीचा विषय ‘ऊर्जा – शोध, संरक्षण व संवर्धन’ असा होता. या परिषदेसाठी राज्यभरातून २० हून अधिक प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे.
शहापूर तालुक्यातील सुररवाडी गावातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘रॉकेलला पर्यायी इंधन म्हणून नैसर्गिक तेलाचा वापर’ या विषयावर आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. रॉकलेच्या तुलनेत नैसर्गिक तेलाच्या वापराने अधिक मिळणारा प्रकाश आणि कमी होणारे प्रदूषण यांची बोलकी चित्रे तक्त्यावर काढून त्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. सोयाबीन, राई, तीळ यांचे तेल रॉकेलच्या तुलनेत जास्त प्रकाश देणारे, कमी प्रदूषणकारी आणि स्वस्त व सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांची याचा अधिकाधिक वापर करावा असा सल्ला या प्रकल्पातून देण्यात आला. विलास भाकरे आणि गणेश भले या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प सादर केला. त्यांचे शिक्षक एम. डी. कांबळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. वाडा येथील ‘क्वालिटी एज्युकेशन ट्रस्ट’च्या सानिका वाघोरे, निशान वाघोरे, अश्विन कोथाले, अश्विनी भोईर आणि कीर्ती पाठारे या विद्यार्थ्यांनी ‘दाढरे गावातील चुलींचा अभ्यास’ या विषयावर आपला प्रकल्प सादर केला. या वेळी गावात वापरण्यात येणाऱ्या चुलींचा अभ्यास करून त्यांचा अधिक कार्यक्षम पद्धतीने कसा वापर करता येईल या विषयावर त्यांनी माहिती दिली. शिक्षक अश्विन कोथाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मोखाडा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या शेणाच्या गोवऱ्या तयार करून त्यांचा योग्य वापर करणे या विषयावर आपला प्रकल्प सादर केला. या परिषदेसाठी सिंघानीया शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक ११५ प्रकल्प सादर केले होते. लोकपुरम, श्रीरंग विद्यालय, या शाळांमधील प्रकल्पांचीही परिषदेसाठी निवड झाली आहे. परिषदेसाठी प्रकल्प निवड होण्याचे श्रीरंग विद्यालयाचे सलग आठवे वर्ष आहे.    

Story img Loader