सामान्य वीजग्राहकांना वीजजोडणी देण्यात ‘टाटा पॉवर कंपनी’ दुजाभाव करत असल्याच्या तक्रारीनंतर आता उपनगरातील सामान्य वीजग्राहकांना नवीन जोडणी देण्यासाठी वा ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’कडून स्थलांतर करून घेण्यासाठी ‘टाटा’ने मोहीम उघडली आहे. त्यात पहिल्या तीन आठवडय़ात तब्बल सात हजार ग्राहकांनी ‘रिलायन्स’ला सोडचिठ्ठी देत ‘टाटा’ची जोडणी घेतली. त्यामुळे या सामान्य वीजग्राहकांच्या दरमहिन्याच्या वीजबिलात तब्बल ३७ ते ४१ टक्क्यांची बचत होणार आहे.
मुंबई शहर व उपनगरात सर्वात स्वस्त दरात वीजपुरवठा करणारी कंपनी म्हणून टाटा पॉवर कंपनी ओळखली जाते. तीन वर्षांपूर्वी उपनगरात किरकोळ वीजविक्री करण्याचा परवानाही ‘टाटा’ला मिळाला. त्यानंतर वीजदेयकातील घसघशीत बचतीचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम विमानतळापासून ते कोकिळाबेन अंबानी रुग्णालयापर्यंतच्या बडय़ा वीजग्राहकांनी ‘रिलायन्स’ला सोडचिठ्ठी देत ‘टाटा’कडे स्थलांतर केले. मात्र, बडय़ा वीजग्राहकांना तातडीने वीज जोडणी देणारे, स्थलांतराची प्रक्रिया पार पाडणारी ‘टाटा पॉवर’ दरमहा शंभर युनिटपर्यंत वा ३०० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या सामान्य वीजग्राहकांना सामावून घेण्यात टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी होत्या. अखेर मागच्या महिन्यात मुंबईतील लोकप्रतिनिधी, वीजग्राहकांनी वीज नियामक आयोगाकडे तक्रार करत न्याय मागितला.
यानंतर ‘टाटा पॉवर’ने सामान्य वीजग्राहकांना वीज जोडणी देण्यासाठी एकप्रकारे मोहीमच उघडली आहे. ठिकठिकाणी वीज जोडणीचे अर्ज स्वीकारणारे व त्यावर कार्यवाही करण्याचे काम सुरू केले. ‘रिलायन्स’कडून ‘टाटा’कडे गेल्यावर वहन आकार द्यावा लागत असला तरी दोन्ही कंपन्यांच्या वीजदरातील लक्षणीय तफावतीमुळे त्यानंतरही ‘टाटा’ची वीज सामान्य ग्राहकांना स्वस्तच पडते. दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्यांना ती ४१ टक्के स्वस्त पडते. तर दरमहा ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांच्या वीजदेयकात ३७ टक्क्यांची बचत होते.
त्यामुळे पहिल्या तीन आठवडय़ात तब्बल ११ हजार २४२ अर्जदारांनी ‘टाटा’कडे अर्ज केला. त्यापैकी ६९३८ अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया संपून त्यांचे ‘टाटा’कडे स्थलांतरही झाले. बाकीच्यांचे अर्जही लवकरच निकाली निघतील. त्यामुळे आता या वीजग्राहकांच्या दर महिन्याच्या विजेच्या खर्चात ३७ ते ४१ टक्क्यांची बचत होणार आहे. आताच्या महागाईच्या काळात सामान्य माणसासाठी हा मोठा दिलासा आहे.
दरमहा १०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी ‘रिलायन्स’चा दर प्रतियुनिट साडे तीन रुपये पडतो. तर त्याचवेळी वहन आकार जोडूनही ‘टाटा पॉवर’चा दर दोन रुपये सात पैसे प्रति युनिट इतकाच पडतो. थोडक्यात वीजदराची तुलना करता १०० युनिटसाठी ‘रिलायन्स’च्या ग्राहकांना ३५० रुपये मोजावे लागतात. तर ‘टाटा’च्या ग्राहकांना २०७ रुपये मोजावे लागतात.
तर दरमहा १०० ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी ‘रिलायन्स’चा वीजदर सहा रुपये ५७ पैसे प्रति युनिट असून ‘टाटा’कडे गेल्यावर तो दर प्रति युनिट चार रुपये १६ पैसे इतका बसतो. त्यामुळे ‘रिलायन्स’ला सोडचिठ्ठी देऊन ‘टाटा पॉवर’कडे गेलेल्या सामान्य वीजग्राहकांची दरमहा चांगलीच बचत होणार आहे.