शहरातील १ हजार ४९१ अतिक्रमणे उठविल्याने त्यावर अवलंबून असणारे साडेसात हजार नागरिक बेघर झाले आहेत. त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणात उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी सात ठिकाणच्या जागांचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून त्या जागा देण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार अग्रवाल यांच्याकडे केली आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार अग्रवाल यांनी संजीवनी उद्योग समूहास भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले, कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. साठवण तलावात गाळ मोठय़ा प्रमाणात असून त्यातील दोन नंबर तळ्याचा गाळ लोकसहभागातून काढला आहे, अजून एक मोठे तळे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरोत्थान योजनेतून पैसे द्यावेत अशी मागणी केली, त्यावर डॉ. संजीवकुमार यांनी त्याबाबतचा प्रस्ताव नगरपालिकेने सादर करावा, लवकरच निर्णय घेऊ असे अश्वासन दिले.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी यावेळी खंडक ऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. हरेगाव, श्रीरामपूर भागातील जमिनवाटपाचे नकाशे प्रसिद्ध झाले, मात्र कोपरगाव तालुक्यातील नकाशे रखडले आहेत. त्यात लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या आवर्तनातून पुर्व भागातील धोत्रे, तळेगावमळे, लौकी, खोपडी, वारी येथील पिण्याच्या पाण्याचे पाझर तलाव अगोदर भरून देण्याची मागणी केली.

Story img Loader