डोंबिवली पूर्व भागातील टिळकनगर भागात एका मोबाइल कंपनीच्या भूमिगत वाहिन्या टाकताना केलेल्या खोदकामामुळे भारत संचार निगमच्या वाहिन्या तुटल्यामुळे टिळकनगर, मानपाडा रस्ता, शिवमार्केट, ब्राह्मण सभा परिसर, पारसमणी चौक भागातील सुमारे सात हजार दूरध्वनी तसेच इंटरनेट सेवा गेल्या १२ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक नागरिकांचे परदेशात आयात-निर्यातीचे व्यवसाय आहेत. काही खासगी वित्तीय कंपन्या, एजंटांना दूरध्वनी, इंटरनेट सेवेच्या माध्यमातून ग्राहक सेवा देतात. अनेक तरुण, तरुणी घरबसल्या आपल्या कार्यालयाशी निगडित कामकाज करीत असतात. व्यापारी मंडळी दैनंदिन बाजारभाव इंटरनेट, फॅक्सच्या माध्यमातून मागवतात. स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेतले जातात. त्यामुळे ही सेवा बंद असल्याने गैरसोय झाली आहे. टिळकनगर दूरध्वनी कार्यालयातील वरिष्ठ अभियंता चंद्रकांत महाजन यांनी पत्रकारांना सांगितले, टिळकनगर टपाल कार्यालयाजवळ आयडिया कंपनीचे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू होते. खोदकाम सुरू असताना तेथे असलेल्या बीएसएनएलच्या चार वाहिन्या तुटल्या.
या वाहिन्यांवर बीएसएनएलच्या सात हजार जोडण्या होत्या. वाहिन्या तुटल्याने सात हजार दूरध्वनी, तसेच इंटरनेट, फॅक्स सेवा बंद पडली आहे. या कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले. डोंबिवलीत अनेक ठिकाणी महापालिकेकडून सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना अनेक वेळा दूरध्वनीच्या वाहिन्या तुटल्या होत्या. या सतत होणाऱ्या त्रासामुळे दूरध्वनी ग्राहक त्रस्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा