शहरातील रुग्णांलयांमधून उघडय़ावर फेकल्या जाणाऱ्या व सार्वजनिक अनारोग्याला कारणीभूत ठरणाऱ्या जैविक कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) मोठी समस्या उपराजधानीला भेडसावत आहे. यासोबतच उघडय़ावर कचरा फेकण्यासाठी जबाबदार असलेल्या काही संस्थांसह डॉक्टरांनाही महापालिकेने गेल्या दीड वर्षांत सुमारे पावणेपाच लाखाचा दंड केला आहे.
शहरातील रुग्णालयांमधून नीडल्स, सिरिंजेस, ड्रेसिंग मटेरियल, मानवी अवयव इ. विविध प्रकारचा जैविक कचरा गोळा करण्याचे कंत्राट महापालिकेने सुपर्ब हायजेनिक डिस्पोझल्स कंपनीला दिले आहे. या कंपनीकडे ७६६ रुग्णालये, ६९१ क्लिनिक्स, २४५ दंत रुग्णालये, ३२ एक्सरे लॅब्ज, सात रक्तपेढय़ा आणि २१४ पॅथॉलॉजी लॅब्जमधील कचरा गोळा करण्याची जबाबदारी असून, त्यांच्यातर्फे दिवसाला सरासरी १३६० किलोग्रॅम कचरा गोळा करण्यात येतो. महापालिकेने या कंपनीशी वार्षिक २३ कोटी ५० लाख रुपयांचा करार केला असून, गेल्या तीन वर्षांत एकूण १८३७.६७८ टन जैविक कचरा गोळा करण्यात आला आहे. जैविक कचरा, ई-वेस्ट आणि इतर कचऱ्याची भांडेवाडी डंपिंग यार्ड येथील इन्सिनरेटरमध्ये विल्हेवाट लावण्यात येते.
मात्र खर्च वाचवावा म्हणून किंवा निव्वळ बेजबाबदारपणा म्हणून शहरात अनेक ठिकाणी जैविक तसेच सामान्य स्वरूपाचा कचरा उघडय़ावर फेकला जातो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यच धोक्यात येते. त्यामुळे अशा रीतीने निष्काळजीपणाने कचरा फेकणाऱ्यांवर महापालिका दंड आकारण्याची कारवाई करते.
१ जानेवारी २०१२ ते ३० मे २०१३ या काळात जैविक व इतर कचरा करणाऱ्या कितीजणांना दंड करण्यात आला, अशी माहिती अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारान्वये विचारली होती.
वरील कालावधीत शहरातील विविध रुग्णालये, क्लिनिक्स आणि इतर संस्था मिळून १६ जणांवर महापालिकेने कारवाई करून त्यांच्याकडून चार लाख ७२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यात अर्नेजा रुग्णालय, डॉ. सेनगुप्ता व ग्रीन सिटी रुग्णालय (प्रत्येकी ५० हजार), डॉ. उन्मेष महाजन, केअर रुग्णालय व आंध्र असोसिएशनचे अमृत भवन (प्रत्येकी ४० हजार), होप रुग्णालय (३५ हजार), भारतीय स्टेट बँक विभागीय कार्यालय, किंग्जवे (३० हजार), डॉ. प्रीती चांडक व स्पंदन रुग्णालय (प्रत्येकी २५ हजार), डॉ. मुकेवार (२० हजार), डॉ. पोफळी, यक्षी रुग्णालय व डॉ. सुशील मानधनिया (प्रत्येकी १५ हजार), गुजरात समाज संस्था (१२ हजार) आणि अवंती रुग्णालय (१० हजार) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
बेजबाबदारपणे कचरा फेकल्याबद्दल अनेकांना दंड भरावा लागला असला, तरीही रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी आणि नागनदीत कचरा फेकला जात असल्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सार्वजनिक आरोग्यबद्दल जागरूकता निर्माण झाल्याशिवाय या समस्येवर उपाय निघणे शक्य नाही, असे म्हणावेसे वाटते.
जैविक कचऱ्यासाठी अनेक डॉक्टरांना दंड
शहरातील रुग्णांलयांमधून उघडय़ावर फेकल्या जाणाऱ्या व सार्वजनिक अनारोग्याला कारणीभूत ठरणाऱ्या जैविक कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) मोठी समस्या उपराजधानीला भेडसावत आहे.
First published on: 03-08-2013 at 03:39 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Several doctor fine for biological waste