पियानो शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थी हा अल्पवयीन असून त्याच्यासोबत अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र दामोसा ऊर्फ दामोदर असे या अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. मुंबईमधील एका बारमध्ये तो पियानो वाजविण्याचे काम करतो. एक महिन्यापूर्वी तो कोपरखैरणे सेक्टर ३ येथील एसएस टाइममधील बैठय़ा चाळीत राहण्यासाठी आला होता. या ठिकाणी तो पियानो शिकविण्याचे वर्ग घेत होता. पीडित विद्यार्थी हा काही दिवसांपासून शिकवणीसाठी येत होता. १५ ऑगस्ट रोजी पीडित विद्यार्थी शिकवणीनंतर घरी आल्यानंतर स्वत:ची कपडे धूत असल्याचे पाहून त्याच्या आईने त्याच्याकडे चौकशी केली.
दामोदर हा गेल्या पाच दिवसांपासून त्याच्यासोबत गैरकृत्य करीत असल्याचे त्याने आईला सांगितले. या वेळी त्याच्या आईने त्याला रागावून दामोदर याच्याकडे न जाण्याचे बजावले. यानंतर पीडित विद्यार्थी घर सोडून निघून गेला होता. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी बांद्रा येथे तो भटकत असताना एका समाजसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांने त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा सर्व प्रकार त्याला सांगितला. त्या कार्यकर्त्यांने त्याला बांद्रा पोलिसांकडे सोपवले. या प्रकरणी प्रथम बांद्रा पोलिसांनी शून्य नंबरने तक्रार दाखल करून घेतली. यानंतर ही तक्रार कोपरखैरणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. तसेच पीडित विद्यार्थ्यांला देखील त्यांच्या ताब्यात दिले. कोपरखैरणे पोलिसांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्याला त्यांच्याकडे सोपवले. या प्रकरणी दामोदर याला बुधवारी सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी दिली आहे.

Story img Loader