मुलांचा अधिक चांगला अभ्यास व्हावा म्हणून पालक आपल्या मुलांना खाजगी शिकवणीसाठी पाठवत असतात. काही शिक्षक घरीच खाजगी शिकवण्या घेत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून याच खाजगी शिकवणी करणाऱ्या शिक्षकांकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कांदिवलीत दहावीत शिकणारी एक मुलगी एका शिक्षकाच्या घरी खाजगी शिकवणी साठी जात होती. तिथे अन्य मुली देखील येत असत. या मुलीची अभ्यासात प्रगती नव्हती. तेव्हा तुला विशिष्ट योग शिकवला तर तुझी प्रगती होईल असे या शिक्षकाने सांगितले. सगळे मुले गेल्यानंतर तिला तो थांबवत असे आणि तिच्यावर योग शिकविण्याच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. त्या मुलीला काय होतय त्याची कल्पना नव्हती. दोन महिने हा प्रकार सुरू होता. अखेर तिने पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चारकोप पोलिसांनी या शिक्षकाला २० नोव्हेंबर रोजी अटक केली. कांदिवलीतील ही घटना एकमेव नाही. गेल्या काही महिन्यात नजर टाकली की शिकवणी शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थीनींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
काही विकृत लोकांमुळे या पेशातील इतर शिक्षकांची बदनामी होत आहे. पण अशा विकृत शिक्षकांची संख्या वाढतेय, ते देखील तितकेच खरे आहे. . प्रत्येक ठिकाणी पोलीस नजर ठेऊ शकत नाही. त्यामुळे पालकांनी काही संभाव्य धोक्यांबाबत आपल्या मुलींना सुचना देऊन सावधगिरी कशी बाळगावी असे पोलिसांनी सांगितले. याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की या मुली अल्पवयीन असल्याने अजाण असतात. शिक्षकांबद्दल त्यांना आदरयुक्त भिती असते. घरी खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक ते अनेकदा ३५-४० वयोगटातील असतात.
त्यामुळे ते शिकवणीच्या बहाण्याने मुलींशी अश्लिल कृत्य करत असतात. अनेकदा मुलींना ते समजत नाही किंवा त्या त्याकडे दुर्लक्ष करत असतात. पालकांनी आपल्या मुलांशी सतत बोलत राहिलं तर या प्रकाराला वाचा फुटू शकेल.
आपल्या मुलांना खाजगी शिकवणीसाठी पाठवताना त्या शिक्षकाची पुरेसी चौकशी करणे, मुलींना शक्यतो एकट्याने न पाठवणे आदी स्वरूपाच्या सुचना पोलीस देतात. शाळेतील शिक्षकांबाबतही या सुचनांचे पालन करणे आवश्य आहे.
या प्रकारांना केवळ मुलीच नाही तर मुलेही बळी पडत असतात. नोव्हेंबर महिन्यात भोईवाडा पोलिासांनी अशाच एका विकृत शिक्षकाला अटक केली. तो अल्पवयीन मुलांना लैंगिक कृत्य करायला भाग पाडून त्याचे मोबाईलमध्ये चित्रण करत होता. दोन मुलांनी तक्रार केल्यानंतर या विकृत प्रकाराला वाचा फुटली. मुले अल्पवयीन असल्याने आम्ही त्यांच्यावर बाललैंगिक शौषण कायद्याअंतर्गत (पोक्सो) कारवाई करतो. याप्रकरणात शिक्षकांनी अन्य काही मुलांचे शोषण केले आहे का त्याचाही तपास केला जातो, असे चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा