तेरा महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल एका विकृत मनोवृत्तीच्या तरुणाला सोलापूरच्या जलदगती न्यायालयाने दोषी धरून सात वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली.  
विशाल शिवाजी कांबळे (वय १९, रा. फक्रुद्दीननगर झोपडपट्टी, सोलापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जलदगती सत्र न्यायाधीश कल्पना व्होरे यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. अलीकडे महिलांवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर अशा अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूरच्या जलदगती सत्र न्यायालयात चालविण्यात आलेल्या खटल्यांपैकी या पहिल्याच खटल्यात आरोपीला दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली आहे.
फक्रुद्दीन नगर झोपडपट्टीत आरोपी विशाल कांबळे याने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबीयातील तेरा महिन्यांच्या मुलीला स्वत:च्या घरात आणले व तिच्यावर अत्याचार करून मनोविकृतीचे दर्शन घडविले. ११ डिसेंबर २०१२ रोजी ही घटना घडली होती. सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण वायकर यांनी या गुन्ह्य़ाचा तपास केला होता. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रवीण शेंडे यांनी तेरा साक्षीदार तपासले. यात डीएनए चाचणीचा अहवाल महत्त्वाचा ठरला. आरोपीतर्फे अ‍ॅड. सुरेश पाटील यांनी काम पाहिले.

Story img Loader