स्वत:च्या जुळ्या मुलींना मोबाइलवर ब्ल्यू फिल्म दाखवून व झोपेच्या गोळ्या देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. अक्कलकोट रस्त्यावरील कुंभारी येथे कॉ. गोदूताई परूळेकर विडी घरकुलात हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित मुलींच्या मातेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंदर्भात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले हे मध्यरात्री कुभारी येथील विडी घरकुल परिसरात गस्त घालत असताना तेथे एक चौदा वर्षांची मुलगी भटकताना आढळून आली. मध्यरात्र उलटली तरी ही अल्पवयीन मुलगी रस्त्यावर कशी, याचे कोडे पडल्याने तिची चौकशी केली असता तिने आई-वडिलांच्या विरोधात तक्रार करीत घरी जाणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विडी घरकुलातील एका प्रतिष्ठाताच्या घरात नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली असता पित्याने ही मुलगी घरातून अधून मधून गायब होते. तिचे चारित्र्य बरोबर नसल्याची तक्रार केली. त्यावरून सदर मुलीला पोलिसांनी बालन्यायालय मंडळासमोर उभे केले. तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. त्याठिकाणी बालकल्याण विभागाच्या त्रिसदस्यीय समितीने विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली.
सदर पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार तिचे वडील दारू प्राशन करून घरी येतात. आई नसताना घरात आपल्या १४ वर्षांच्या जुळ्या मुलींना मोबाइलवर ब्ल्यू फिल्म दाखवून व झोपच्या गोळ्या देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. पित्याने अशाप्रकारे पाच ते सहावेळा हे राक्षसी कृत्य केले. झोपेच्या गोळ्या खाण्यास नकार दिला तर वडील केस धरून डोके भिंतीवर आपटतात. त्यामुळे घाबरून पित्याकडून होणारे लैंगिक अत्याचार सहन केले. मात्र आईच्या कानावर ही बाब घातली असता तिने वडिलांना जाब विचारण्याऐवजी आम्हालाच दरडावल्याची व्यथा सदर पीडित मुलीने मांडली. बालकल्याण समितीने तिचा जबाब नोंदवून पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. या अत्याचार प्रकरणातील आरोपी पिता मूळचा कर्नाटकातील रायचूरचा रहिवासी असून तो चार महिन्यांपूर्वी सोलापुरात आला. विडी घरकुल परिसरात भाडय़ाने घर घेऊन कुटुंबीयांसह राहू लागला. तो आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला आठ मुले आहेत. तर एका मुलीचे लग्न झाले आहे.

Story img Loader