कविता ही समकालीन वास्तवाची सामग्री वापरत असली, तरीही वर्तमान वास्तव सोडून व्यापक व वैश्विक पातळीवर जाणारा कविता हा वाङ्मय प्रकार आहे. मानवी जीवनातील वैश्विक सत्य प्रकट करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे असे कवीला वाटले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी केले.
शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. रसाळ यांना ‘शब्दसह्याद्री साहित्य सन्मान’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. रोख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तु. शं. कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, भरत दौंडकर, प्रिया धारुरकर, वीरधवल परब आदींसह शब्दस्’ााद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. रसाळ म्हणाले, की कविता हेच वाङ्मयाचे मूलगामी व आद्य रूप आहे. मराठी समीक्षा कवितेच्याच आधाराने विकसित झाली आहे. कवीचे खरे प्रेम शब्दांवर असावे. त्याला शब्द कळला तरच तो चांगली कविता लिहितो. कुठल्याही तत्त्वज्ञाएवढीच कवीची पातळी श्रेष्ठ असते. कवी तत्त्वज्ञाचेच कार्य वेगळय़ा पातळीवर करीत असतो. कवीने कोणत्याही इझमशी स्वत:ला बांधून घेऊ नये. तसे झाले तर इझम मांडणारे श्रेष्ठ आणि तुम्ही त्यांचे अनुयायी असेच होते. इझम निर्माण करणाऱ्या तत्त्वज्ञापेक्षाही कवी मोठा असतो, असे सांगून डॉ. रसाळ यांनी पु. शि. रेगे, बा. सी. मर्ढेकर, अरुण कोलटकर यांच्यासारखी श्रेष्ठ कविता आज का जन्मत नाही, याचा विचार कवींनीच केला पाहिजे, असे मत मांडले.
हा पुरस्कार समाधान देणारा असून, परभणी हे मराठवाडय़ाचे केंद्र व गाभा आहे. त्यामुळे परभणीने केलेले कौतुक म्हणजे सगळय़ा मराठवाडय़ाने केलेले कौतुक आहे, अशी कृतज्ञता डॉ. रसाळ यांनी व्यक्त केली. प्रा. कुलकर्णी यांनीही आपण मूळचे परभणीकर असे आवर्जून सांगितले. डॉ. रसाळ यांच्याविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले. आपल्या भाषणात त्यांनी नर्मविनोदी शैलीत ‘गुरुशिष्य’ या अनुबंधाची उकल केली. इंद्रजित भालेराव यांनी प्रास्ताविक केले. बबन आव्हाड यांनी डॉ. रसाळ यांचा परिचय करून दिला. बाळासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कांतराव देशमुख, सोपानराव अवचार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य बाळासाहेब जाधव यांचा प्राचार्य महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Story img Loader