‘शब्द द बुक गॅलरी’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘शब्द’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदाच्या पुरस्कारांसाठी नाटककार महेश एलकुंचवार (दुर्गा भागवत शब्द पुरस्कार), लेखक दीनानाथ मनोहर (भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार), पत्रकार व नाटककार जयंत पवार (बाबुराव बागुल शब्द पुरस्कार) यांची निवड करण्यात आली आहे.
तीनही पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे दहा हजार रुपये, एकवीस हजार रुपये आणि दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. एलकुंचवार यांच्या ‘मौनराग’ तर पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राकेतून उठला मोर’ या पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. समाजरचनेतील विविधांगी अर्थपूर्णतेचा आणि अर्थशून्यतेचा वेध घेणाऱ्या कादंबऱ्यांच्या लेखनासाठी मनोहर यांची निवड झाली आहे.
दुर्गा भागवत शब्द पुरस्कारासाठी प्रा. दीपक घारे, प्रा. नितीन रिंढे, ज्ञानदा देशपांडे यांनी काम पाहिले. भाऊ पाध्ये शब्द गौरव पुरस्कारासाठी प्रा. दिगंबर पाध्ये, प्रा. नितीन रिंढे, प्रा. हरिश्चंद्र थोरात यांनी तर बाबुराव बागूल शब्द पुरस्कारासाठी प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. रेखा इनामदार-साने व डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी काम पाहिले.
पुरस्कार प्रदान समारंभ येत्या ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरिवली (पश्चिम) येथे होणार असून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. गो. पु. देशपांडे हे अध्यक्ष व ज्येष्ठ हिंदी साहित्यिक उदय प्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात एलकुंचवार आणि पवार यांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित करणाऱ्या मौज प्रकाशन आणि लोकवाङ्मय प्रकाशन गृह यांनाही गौरविण्यात येणार आहे. 

Story img Loader