छत्तीसगडमधील दन्तेवाडा जिल्ह्य़ात नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झालेला उडतरे (ता. वाई) येथील जवान राजेंद्र कुंभार (वय ३५) यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी (दि. ४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दन्तेवाडा जिल्ह्य़ातील बाचेली भागातील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संकुलात कोळसा खाणीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र कुंभार यांच्यासह पश्चिम बंगालमधील एक जवान हुतात्मा झाला. १२ वर्षांपूर्वी तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाला होता. सुरुवातीला मध्य प्रदेशात नऊ वर्षे त्यानंतर तीन वर्षे मुंबई येथे सेवा बजावून सात महिन्यांपूर्वी त्यांची तुकडी कोळसा खाणींच्या रक्षणासाठी पाठविण्यात आली होती. वाई तालुक्यातील उडतरे या आपल्या गावी आल्यानंतर सहकारी मित्रांना आपल्या सेवेतील अनुभव तो सांगत असे. नुकताच गणेशोत्सवात तो गावी आला होता. ‘आमचे काही खरे नाही. आम्ही पुन्हा परत येऊ की नाही हे सांगता येत नाही. आम्हाला नक्षलवाद्यांपासून फारच सावध राहावे लागते’ असे त्याने सांगितले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक वर्षांची मुलगी, मोठा भाऊ, आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
दन्तेवाडा येथेच मागील दोन वर्षांपूर्वी नक्षलवादी हल्ल्यात वाई तालुक्यातील धोम येथील चंद्रशेखर देशमुख हा जवान हुतात्मा झाला होता. त्यानंतर तेथेच राजेंद्र कुंभार हा दुसरा जवान हुतात्मा झाला. उडतरे या गावाला ही सैन्य परंपरा आहे. कारगिल युद्धात ७ फेब्रुवारी २००३ रोजी अशोक सीताराम बाबर हा शहीद झाला होता. त्याचे स्मारक गावात उभारण्यात आले आहे. हुतात्मा जवान राजेंद्र कुंभार याचा ५ नोव्हेंबर हा वाढदिवस त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. तर सहा तारखेला त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे. या विचित्र योगायोगामुळे उपस्थितात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. रविवारी सायंकाळीच त्याच्या मृत्यूची खबर गावात पोहोचली होती. आज सकाळपासून गावात मोठी गर्दी होती. आजूबाजूच्या गावातून लोक आले होते. आज सायंकाळी त्याचा मृतदेह उडतारे या गावी आणण्यात आला. कुटुंबासह मित्र परिवार जोरदार आक्रोश केला. राजेंद्र कुंभार अमर रहे असेही बोलले जात होते. कृष्णा तीरावर शासकीय इतमामात सायंकाळी आठ वाजता अत्यंसंस्कार करण्यात आले. सातारा पोलिसांनी त्याला मानवंदना दिली. या वेळी माजी मंत्री प्रतापराव भोसले, आमदार मकरंद पाटील, नारायण पवार, प्रांताधिकारी सूरज वाघमारे, तहसीलदार सुनील चंदनशिवे आदी उपस्थित होते. पुण्याहून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची बटालियन गौतम कोमर या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आली होती. त्यांनीही राजेंद्र कुंभार या हुतात्मा जवानाला सलामी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा