बॉलीवूडमध्ये मसालापटांची नेहमीच चलती राहिली आहे, अजूनही काही प्रमाणात असते. बडे स्टार कलावंत असलेले बहुतांशी चित्रपट हे मसालापटच असतात. बॉलीवूडचा तद्दन गाणी-नृत्य याचा अतिरेकी फॉम्र्युला सदोदित यशस्वी होत आला आहे. नायक-नायिका-खलनायक असा त्रिकोणी तद्दन गल्लाभरू फॉम्र्युला आता बॉलीवूडला नको आहे. ‘आर.. राजकुमार’ या चित्रपटात कलावंतांनी घातलेला असह्य़ धुडगूस पाहून बॉलीवूडचा जुनाच फॉम्र्युला अतिशय सरधोपट, अतिरेकी पद्धतीने पडद्यावर मांडला आहे. २०१३ सालातला अतिशय वाईट चित्रपट अशी या चित्रपटाची नोंद व्हायला हरकत नाही.
‘तुम सायलण्ट हो जाओ नही तो मैं व्हायोलण्ट हो जाऊंगा’ हा संवाद अखंड सिनेमातून शाहीद कपूरने ठिक ठिकाणी म्हटला आहे. परंतु, त्याला बडय़ा कलावंतांसारखे वलय नसल्यामुळे शाहीद खूपच सडकछाप दिसतो. वेगवेगळे चित्रपट प्रकार करून पाहण्यासाठी शाहीद सज्ज झाला आहे, असे त्याचा हा चित्रपट पाहताना जाणवत असले तरी जुन्याच पद्धतीच्या चित्रपटासारखा तो या चित्रपटातून लोकांसमोर आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची छाप असलेले अनेक बॉलीवूडपट येऊन गेले आहेत. त्यामध्ये सर्वात खालच्या दर्जाचा हा चित्रपट म्हणता येईल. नृत्य दिग्दर्शक प्रभु देवाचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट असल्यामुळे भरपूर गाणी, भरपूर नृत्य यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात जातील. परंतु, शाहीद-सोनाक्षी आणि त्यांच्या मागे ढीगभर एक्स्ट्रा कलावंतांचा नृत्य धुडगूस असह्य़ झाल्याशिवाय राहणार नाही. आपला चित्रपट कसा आहे हे गाणी-नृत्य यातून दिग्दर्शकाने पुरेपूर दाखवून दिले आहे. ‘मत मारी गई’, ‘गंदी बात’, ‘धोका धडी’, ‘कद्दू कटेगा’ अशा गाण्यांच्या शब्दांवरूनच प्रेक्षकाला चित्रपटाची लायकी, बिनडोक फॉम्र्युलाबाज करमणुकीचा दर्जा किती खालचा आहे ते समजू शकेल असा हा चित्रपट आहे.
आर. राजकुमार या शीर्षकातला आर म्हणजे रोमिओ. हा रोडरोमिओसारखा दिसणारा शाहीद कपूर मारामारी करण्याची हौस असल्यामुळे एका शिवराज नामक सोनू सूदच्या टोळीत सामील होतो.
शिवराजचा कट्टर विरोधक असलेल्या परमार याच्या गुंडांना शाहीद मारतो. आधी परमारशी शत्रुत्व असलेला राजकुमार नंतर शिवराजच्या विरोधात जातो. कारण नायिका. शत्रुत्व संपवून परमार आपली पुतणी चंदा अर्थात सोनाक्षी सिन्हाचे शिवराजशी लग्न लावून देण्याचे ठरवितो. मग काय मारामारीची अखंड हौस असलेला राजकुमार शिवराजला आव्हान देतो.
दिग्दर्शकाने अखंड चित्रपटभर भडक रंग, भडक कपडे, अतिभडक अंतिरंजितपणाचा कळस केला आहे. सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांसारखीच ही आणखी एक भूमिका आहे. नायिका म्हणून तिला काहीच स्वत:चे मत नाही. राजकुमार किंवा शिवराज यांची वस्तू असल्यासारखी ती वावरते.
उत्तम नृत्य दिग्दर्शकाने कोणत्याही नजाकतीविना बनविलेला गल्लाभरू सिनेमा प्रेक्षकाला मात्र हैराण करून सोडतो.
आर.. राजकुमार
नेक्स्ट जेन फिल्म्स प्रस्तुत
निर्माते – विकी राजनानी, सुनील लुल्ला
दिग्दर्शक – प्रभु देवा
पटकथा – प्रभु देवा, सुनील अग्रवाल, रवी एस सुंदरम
संवाद – शिराज अहमद
संगीत – प्रीतम, संदीप चौटा
छायालेखन – मोहन कृष्ण
कलावंत – शाहीद कपूर, सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद, मुकूल देव, आशिष विद्यार्थी, असरानी, श्रीहरी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा