हिंदू नववर्ष शोभायात्रा समिती, लालबागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा शोभायात्रा काढण्याबरोबरच अनेक पारंपरिक कार्यक्रम सादर करून नववर्षांचे स्वागत केले जाणार आहे. परंतु यंदाच्या गुढीपाडवा उत्सवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झालेल्या आणि मराठी मनाला साद घालणाऱ्या शाहिरांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील गाणीही सादर केली जाणार आहेत. संयुक्त महाराष्ट्र उगवते सरकारा, खुशाल कोबडं झाकून धरा या गाण्यांतून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जान फुंकणाऱ्या शाहिरांचा सन्मान केला जाणार आहे.
शाहीर मधु खामकर यांनी ‘वृत्तान्त’ला सांगतिले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचे योगदान देऊन त्या वेळी मराठी मनामनांत आपल्या शाहिरीतून अस्मिता जागविणाऱ्या शाहिरांना शासन विसरले पण गिरणगाव विसरू शकत नाही. म्हणूनच यंदाच्या स्वागतयात्रेत दहा शाहिरांचा सन्मान केला जाणार आहे. आपल्यासह केशर जैनू शेख, निशांत शेख, दत्ता ठुले, आनंद सावंत, भिकाजी भोसले, मनोहर वळंजू, रमेश नाखवा, इंद्रायणी पाटील तसेच डान्स ग्रुप व अन्य साथीदारांचा सत्कार केला जाणार आहे.
दरम्यान, परिसरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्त्यांना एका मंचावर आणून स्त्री-भ्रूणहत्या तसेच अन्य सामाजिक विषयांवरचे चित्ररथ घेऊन यात्रा काढली जाणार आहे. लालबागचा राजा येथून निघालेली शोभायात्रा सरदार हॉटेल, लाड मार्ग, आंबेडकर रोड या मार्गाने भारतमाता चौकातून मेघवाडीपर्यंत काढली जाणार आहे, अशी माहिती कार्यकर्ते अरुण दळवी यांनी दिली.