शाहरूखचा ४७ वा वाढदिवस नुकताच झाला. ऐन दिवाळीत त्याचा ‘जब तक है जान’ प्रदर्शित होतोय. कोणालाही हेवा वाटावा, असे सारे काही त्याच्याजवळ आहे, यश, पैसा, प्रसिद्धी, चाहते, मित्र सारे काही आहे. पण तरीसुद्धा यशाच्या शिखरावर पोहोचलेला शाहरूखला ‘आहे मनोहर तरी गमते उदास..’ ही भावना कुरतडते आहे. 
गोव्यात नुकत्याच झालेल्या थिंकफेस्ट परिषदेत शाहरूख खानने ही भावना बोलून दाखविली. यशाच्या शिखरावर पोहोचलो असलो तरी तिथे एकटेपणाची भावना तीव्र झाली आहे. एक प्रकारची ‘पोकळी’ निर्माण झाली आहे, या विचाराने मला पछाडले आहे, असे तो म्हणाला.
‘माझे सुंदर कुटुंब आहे, काही मोजक्या जिवलग मित्रांसोबत मी आनंदात वेळ घालवतो. मला माझ्या वडिलांसारखे ‘अज्ञात’ राहून मरायचे नाही. मला फक्त यशस्वीच व्हायचेय. पण खरे सांगायचे तर शिखरावर असलो तरी मी एकटा पडलोय’ असे सांगताना शाहरूख गहिवरून गेला होता. याच ओघात ‘आपले आत्मचरित्र लिहून तयार झाले असून आता त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे’, अशी ‘बातमी’ही त्याने दिली.‘आतून रिकामे झाल्याच्या भावनेने मी हवालदिल झालोय. विचित्र अशी ही भावना आहे. ही पोकळी मी अभिनयाने भरून काढतोय खरा. पण ..’आपले गतायुष्य उलगडताना भावूक झालेला शाहरूख म्हणाला, चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या माझ्या व्यक्तिरेखांपैकी सुमारे ९० टक्के माझ्या स्वत:च्याच आयुष्याचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. 
वडील ही शाहरूखची मर्मबंधातली ठेव! शाहरूख सांगतो, मी १५ वर्षांचा असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा आणि त्यानंतर बराच काळ आमच्या कुटुंबाला पैशांची मोठी चणचण होती. एकदा वडील दिल्लीत सिनेमा पाहायला घेऊन गेले. परंतु, त्यावेळी तिकीटाएवढे पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. म्हणून मग आम्ही दोघे थिएटरच्या बाहेर रस्त्यावर बसलो. तेव्हा ते मला म्हणाले, या रस्त्यावरून जाताना मोटारी किती छान दिसतात ना..! मला जेव्हा माझ्या मुलाला सिनेमा पाहण्यासाठी न्यायचे असते तेव्हा त्याला सिनेमा दाखविता आला पाहिजे, रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी दाखविण्याची वेळ माझ्यावर यायला नको, हे मला तेव्हा जाणवले, असे अतिशय भावूक होत शाहरूखने सांगितले. माझा भूतकाळ, माझ्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती, वडिलांचा अचानक मृत्यू, त्याचा बहिणीला बसलेला तीव्र धक्का या सगळ्या गोष्टी कायमच्या लक्षात राहिल्या आहेत. त्याची आठवण झाली की अस्वस्थ वाटते, बॉलिवूडस्टाइल फिल्मी गोष्टी माझ्यात आहेत. त्यामुळे माझ्या भावना मला लपविता येतात. खरेतर या सगळ्यामुळे येणाऱ्या मानसिक ताणतणावांचा सामना करण्यासाठीच मी अभिनय करतो’, असे किंग खानने मोकळेपणी सांगितले तेव्हा उपस्थितांमध्ये एक प्रकारची स्तब्धता पसरली.

Story img Loader