श्रीगोंदे नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अख्तर शेख यांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५मधील तरतुदीनुसार बडतर्फ करण्यात आले आहे.
नगरसेवक शेख यांनी पात्र नसतानाही स्वत:चे व कुटुंबीयांचे नाव दारिद्रय़रेषेखालील यादीत समाविष्ट करून या योजनेचा लाभ घेतला. माजी नगरसेवक नंदकुमार बोरूडे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती व तसे पुरावे जोडले होते. त्यामुळे हे प्रकरण नगर विकास विभागाकडे पाठवण्यात आले. तिथे या प्रकरणाची सुनावणी होऊन याचा निकाल देताना नगर विकास खात्याने शेख यांच्यावर असलेला आरोप सिद्ध होत असल्याने पदाचा गैरवापर करून नियम व अटीचा भंग केला असा निष्कर्ष काढला व त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे कळवले.
या घटनेचे वृत्त श्रीगोंदे शहरात समजताच राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्याच काही कार्यकर्त्यांनी शेख यांना बडतर्फ केल्याचे समजताच पेढे वाटून आंनद साजरा केला याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होती.